छेडखानीवरून वाद, दोन गट आमोरासमोर
By Admin | Published: July 10, 2015 01:24 AM2015-07-10T01:24:15+5:302015-07-10T01:24:15+5:30
गांधी चौकात काही काळ तणावाचे वातावरण.
अकोला: युवतीच्या छेडखानीवरून वाद उपस्थित झाल्याने दोन गट आमोरासमोर उभे ठाकल्याने गांधी चौकात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ही घटना गुरुवारी रात्री १0.१५ वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. शहरातील एक युवती तिच्या भावासोबत खरेदी करण्यासाठी गांधी रोडवर आली. यावेळी गवळीपुर्यातील सिमरान गौरवे नामक युवकाने युवतीची छेड काढली. युवतीच्या भावाने युवकाला जाब विचारला. दोघांमध्ये वाद झाला. वादामध्ये गौरवे याने कत्ता आणून युवतीच्या भावावर हल्ल्याचा प्रयत्न केला आणि जमाव गोळा केला. ही माहिती दुसर्या गटातील युवकांना कळल्यावर तेही गांधी चौकात गोळा झाले. दोन्ही गट एकमेकांसमोर उभे ठाकल्याने दंगल उसळते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे दुकानदारांनीही त्यांची दुकाने बंद केली; परंतु कोतवाली पोलिसांचा ताफा घटनास्थळावर वेळीच हजर झाल्याने परिस्थिती नियंत्रणात आली. पोलिसांनी छेडखानी करणार्या युवकाला ताब्यात घेतले. घटनेची माहिती शहरात वार्यासारखी पसरली. दोन्ही गटातील १00 ते १५0 लोक पोलीस ठाण्यावर गोळा झाले. रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पोलीस ठाण्यामध्ये गोळा होत असलेला जमाव पाहून आरसीपी जवानांना पाचारण करण्यात आले. तसेच गांधी रोड परिसरात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला.