सोयाबीनचे ‘बोनस’ तातडीने वितरित करा!

By admin | Published: July 15, 2017 02:05 AM2017-07-15T02:05:08+5:302017-07-15T02:05:08+5:30

शेतकरी जागर मंचची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Distribute soya bean 'bonuses' immediately! | सोयाबीनचे ‘बोनस’ तातडीने वितरित करा!

सोयाबीनचे ‘बोनस’ तातडीने वितरित करा!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: गतवर्षीच्या खरीप हंगामात सोयाबीन विकलेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाने जाहीर केलेल्या प्रति क्विंटल २०० रुपयेप्रमाणे बोनसचा लाभ जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अद्याप मिळाला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सोयाबीनचे ‘बोनस’ तातडीने वितरित करण्यात यावे, अशी मागणी शेतकरी जागर मंचच्यावतीने शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
गतवर्षीच्या खरीप हंगामात सोयाबीन विकलेल्या शेतकऱ्यांसाठी प्रति क्विंटल २०० रुपयेप्रमाणे बोनस शासनाकडून जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्यातील अकोला, अकोट, तेल्हारा, बाळापूर, पातूर, बार्शीटाकळी व मूर्तिजापूर या सातही तालुक्यातील २२ हजार ९२७ शेतकरी सोयाबीन बोनससाठी पात्र ठरले असून, पात्र ठरलेल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना बोनस वाटप करण्यासाठी ७ कोटी ५६ लाख ४९ हजार रुपयांच्या निधी मागणीचा प्रस्ताव संबंधित यंत्रणेमार्फत शासनाकडे सादर करण्यात आला आहे; परंतु सोयाबीन बोनससाठी पात्र ठरलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अद्याप बोनस रकमेचा लाभ मिळाला नाही. शेतमालाचे पडलेले भाव, निसर्गाची अवकृपा आणि कर्जमाफीचे मृगजळ यामुळे मेटाकुटीस आला असताना गतवर्षी सोयाबीन विकलेल्या शेतकऱ्यांना सोयाबीन बोनसची रक्कम अद्याप मिळाली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तातडीने सोयाबीन बोनस वितरित करण्यात यावे, अशी मागणी शेतकरी जागर मंंचच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे सादर करण्यात आले. यावेळी शेतकरी जागर मंचचे प्रशांत गावंडे, जगदीश मुरुमकार, विजय देशमुख, मनोज तायडे, ज्ञानेश्वर गावंडे, ज्ञानेश्वर सुलताने, रंगराव टेके, शिवाजी म्हैसने, दिलीप मोहोड, सैय्यद वासीफ, दीपक गावंडे, सैय्यद अजीज, प्रमोद गायकवाड, महादेवराव वानखडे, अनिल ठेकेदार, शेख अन्सार, श्रीकृष्ण माळी, कैलास विरोकार, बलदेवराव पळसपगार उपस्थित होते.

१९ जुलैपर्यंत बोनस द्या; अन्यथा तीव्र आंदोलन!
जिल्ह्यातील सोयाबीन विकलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १९ जुलैपर्यंत बोनस वितरित करण्यात यावे अन्यथा शेतकरी जागर मंच आक्रमक भूमिका घेणार असून, तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात शेतकरी जागर मंचने दिला आहे.

Web Title: Distribute soya bean 'bonuses' immediately!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.