तूर डाळ वितरणात दांडी; २५ पाकिटांच्या पोत्यात डाळीच्या २३-२४ पाकिटांचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 05:11 PM2018-01-17T17:11:54+5:302018-01-17T17:14:02+5:30
अकोला: जिल्ह्यातील रास्त भाव दुकानांना एका पोत्यात तूर डाळीची २५ पाकिटे वितरित करण्याच्या नावाखाली प्रत्यक्षात डाळीच्या २३ ते २४ पाकिटांचे वितरण करण्यात येत आहे.
अकोला: बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत जिल्हा पुरवठा विभागामार्फत जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांना रास्त भाव दुकानांमधून ५५ रुपये किलो दराने तूर डाळीचे वाटप सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी जिल्ह्यातील रास्त भाव दुकानांना एका पोत्यात तूर डाळीची २५ पाकिटे वितरित करण्याच्या नावाखाली प्रत्यक्षात डाळीच्या २३ ते २४ पाकिटांचे वितरण करण्यात येत आहे. त्यामुळे तूर डाळ वितरणात दांडी मारली जात असल्याची बाब समोर आली आहे.
बाजार हस्तक्षेप योजनेत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत प्राधान्य गटातील शिधापत्रिकाधारक लाभार्थी, अंत्योदय योजनेंतर्गत शिधापत्रिकाधारक लाभार्थी आणि एपीएल केशरी शिधापत्रिकाधारक शेतकरी लाभार्थींना सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत रास्त भाव दुकानांमधून ५५ रुपये प्रती किलो दराने तूर डाळ वाटप करण्याचा निर्णय शासनामार्फत घेण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील रास्त भाव दुकानांमधून शिधापत्रिकाधारक लाभार्थींना तूर डाळीचे वाटप करण्यात येत आहे. त्यासाठी महाराष्ट्र स्टेट को-आॅपरेटिव्ह फेडरेशनद्वारे जिल्हा मार्केटिंग अधिकाºयांमार्फत तूर डाळीचा साठा जिल्हा पुरवठा विभागामार्फत रास्त भाव दुकानांना वितरित करण्यात येत आहे. त्यामध्ये एका पोत्यात एक किलो वजनाचे तूर डाळीची २५ पाकिटे याप्रमाणे रास्त भाव दुकानांना तूर डाळ वितरित करण्यात येत आहेत; परंतु; २५ पाकिटांच्या एका पोत्यात प्रत्यक्षात तूर डाळीचे २३ ते २४ पाकिटेच रास्त भाव दुकानांना मिळत आहेत. रास्त भाव दुकानांना तूर डाळीची पाकिटे कमी मिळत असल्याने तूर डाळ वितरणात दांडी मारली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे.
रास्त भाव दुकानांमधून शिधापत्रिकाधारकांना ५५ रुपये किलो दराने तूर डाळ वाटप करण्यासाठी रास्त भाव दुकानांना उपलब्ध होणाºया तूर डाळीच्या साठ्यात एका पोत्यात तूर डाळीची २५ पाकिटे उपलब्ध होणे अपेक्षित आहे; परंतु प्रत्यक्षात रास्त भाव दुकानांना एका पोत्यात तूर डाळीचे २३ ते २४ पाकिटेच मिळत आहेत. यासंदर्भात जिल्हा पुरवठा अधिकाºयांकडे तक्रार करण्यात आली आहे.
-शत्रुघ्न मुंडे,
जिल्हाध्यक्ष, रास्त भाव दुकानदार संघटना,अकोला