अकोला जिल्ह्यात ३० कोविड रुग्णालयांना ५३५ रेमडेसिविर इंजेक्शनचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 10:10 AM2021-05-11T10:10:27+5:302021-05-11T10:10:34+5:30
Remedesivir Injection : ३० कोविड रुग्णालयांना ५३५ रेमडेसिविर इंजेक्शनचे वाटप प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
अकोला : कोरोनाबाधित रुग्णांसाठी जिल्ह्यातील ३० कोविड रुग्णालयांना ५३५ रेमडेसिविर इंजेक्शनचे वाटप सोमवारी जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले असून, वाटप करण्यात आलेले इंजेक्शनचे वितरण शासकीय दराने करण्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जिल्ह्यातील कोविड रुग्णालयांना दिला.
जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून, शासकीय आणि खासगी कोविड रुग्णालयांमध्ये दाखल होणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी कोरोना प्रतिबंधक रेमडेसिविर इंजेक्शनच्या मागणीतही वाढ झाली आहे. त्यानुषंगाने कोरोनाबाधित रुग्णांसाठी जिल्हा प्रशासनामार्फत संबंधित खासगी कोविड रुग्णालयांना रेमडेसिविर इंजेक्शनचे वाटप करण्यात येत आहे. त्यामध्ये सोमवारी, १० मे रोजी जिल्ह्यातील ३० कोविड रुग्णालयांना ५३५ रेमडेसिविर इंजेक्शनचे वाटप प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. संबंधित औषधींच्या दुकानांमधून रेमडेसिविर इंजेक्शन प्राप्त झाल्यानंतर कोविड रुग्णालयांनी रुग्णांसाठी शासनाने निश्चित केलेल्या दरात रेमडेसिविर इंजेक्शनचे वितरण करण्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जिल्ह्यातील संबंधित काेविड रुग्णालयांना दिला.
इंजेक्शन वापरलेल्या रुग्णांची यादी सादर करा!
कोरोनाबाधित रुग्णांसाठी दररोज वापरलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनसंदर्भात रुग्णांची यादी दररोज सायंकाळी ६ वाजेपर्यंत संबंधित कोविड रुग्णालयांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या सहायक आयुक्त कार्यालयाकडे न चुकता सादर करावी. या कामात हलगर्जीपणा होता कामा नये, असा आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी कोविड रुग्णालयांना दिला आहे.