मुंडगाव येथे बेबी केयर किटचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:19 AM2021-03-10T04:19:15+5:302021-03-10T04:19:15+5:30

जिल्हा परिषद शाळेत विशेष पुरस्कार समारंभ दानापूर: माळेगाव बाजार केंद्र अंतर्गत जिल्हा परिषद शाळा दानापूर येेथे विद्यार्थ्यांची संख्या घटत ...

Distribution of baby care kits at Mundgaon | मुंडगाव येथे बेबी केयर किटचे वितरण

मुंडगाव येथे बेबी केयर किटचे वितरण

Next

जिल्हा परिषद शाळेत विशेष पुरस्कार समारंभ

दानापूर: माळेगाव बाजार केंद्र अंतर्गत जिल्हा परिषद शाळा दानापूर येेथे विद्यार्थ्यांची संख्या घटत होती, परंतु येथील शिक्षक पातुर्डे यांच्यासह शिक्षकांनी परिश्रम घेत, विद्यार्थी संख्या वाढविली. विद्यार्थी संख्या वाढविण्यासाठी विशेष पुरस्कार समारंभ घेण्यात आला. यावेळी शाळा समिती अध्यक्ष महादेव वानखडे उपस्थित होते.

मुंडगाव येथे श्रींचा प्रकटोत्सव

मुंडगाव : श्रीक्षेत्र मुंडगाव येथील संत गजानन महाराज पादुका संस्थानमध्ये साध्या पद्धतीने प्रकट दिन साजरा करण्यात आला. कोरोनामुळे भाविकांनी मंदिराबाहेरूनच पादुकांचे दर्शन घेतले. महाप्रसादही यंदा रद्द करण्यात आला.

उमरी येथे पोलीस आपल्या दारी

मूर्तिजापूर: तालुक्यातील उमरी अरब येथे पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांच्या संकल्पनेनुसार, पोलीस आपल्या दारी उपक्रम सुरू करण्यात आला. जि.प. प्राथमिक मराठी शाळेत शनिवारी हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी पीएसआय रत्नपारखी, कर्मचारी बोरकर, श्याम, घोंगे, राठोड, पोलीस पाटील प्रकाश गोरले, शकील चाऊस, सोहेल चाऊस, सत्तार कुरेशी उपस्थित होते.

लक्ष्येश्वर संस्थान लाखपुरीचा यात्रा उत्सव रद्द

लाखपुरी : मूर्तिजापूर तालुक्यातील लाखपुरी येथील लक्ष्येश्वर संस्थानने यंदा महाशिवरात्रीनिमित्त होणारा यात्रा महोत्सव कोरोनामुळे रद्द केला आहे. लाखपुरी येथे १० ते १२ मार्चपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. भाविकांनी घरात राहूनच उत्सव साजरा करावा.

अडगाव येथील द्वारकेश्वर संस्थानचा उत्सव रद्द

अडगाव : अडगाव बु. येथील द्वारकेश्वर संस्थानचा महाशिवरात्रीनिमित्तचा उत्सव रद्द करण्यात आला आहे, तसेच अडगाव ते भांंबेरीदरम्यान दरवर्षी निघणारी भाऊसाहेब महाराज यांची पायदळ पालखीही रद्द करण्यात आली आहे.

महिला दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम

बार्शीटाकळी: महिला दिनानिमित्त बार्शीटाकळी येथे महात्मा फुले समता परिषद व राकाँ.ओबीसी सेलने ठिकठिकाणी वृक्षारोपण केले. यावेळी तालुकाध्यक्ष नेहा राऊत, माजी सभापती चंद्रकला राऊत, मीना राऊत, पूनम लांडे, मंगला राऊत, रेखा राऊत, जिजाबाई राऊत, वनमाला राऊत, योगिता खंडारे, शालू खंडारे, शारदा राऊत उपस्थित होत्या.

बाळापूर पोलीस ठाण्यात शांतता समितीची सभा

बाळापूर: महाशिवरात्री, होळी, रंगपंचमी उत्सव घरीच साजरे करा, असे आवाहन बाळापूरचे ठाणेदार दत्तात्रय आव्हाळे यांनी सोमवारी शांतता समितीच्या सभेत केले. बैठकीला किशोर गुजराथी, उमेशआप्पा भुसारी, सुरेश शेलार, करणसिंह ठाकूर, मो.इरफान, साजीद इकबाल, राहुल अहिर, मो. अक्रम, रमेश ठाकरे आदी उपस्थित होते.

बोरगावात २० जणांना कोरोनाची बाधा

बोरगाव मंजू: बोरगाव मंजू येथे ६ मार्च रोजी झालेल्या कोरोना चाचणीत १५० जणांची तपासणी करण्यात आली. यात एकूण २० जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. गावाची २२ हजार लोकसंख्या आहे. नागरिकांनी कोरोनाची तपासणी करून घ्यावी, असे आवाहन उपविभागीय अधिकारी डॉ.नीलेश अपार यांनी केले.

भंडारज बु. येथे तीन जण पॉझिटिव्ह

शिर्ला: पातूर तालुक्यातील भंडारज बु. येथील काही रुग्णांची कोरोना चाचणी केली असता, चाचणीमध्ये सोमवारी गावातील तीन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे गावात भीतीचे वातावरण आहे. नागरिकांनी घाबरून न जाता, नियमांचे पालन करावे, असे आरोग्य विभागाने म्हटले आहे.

विष प्राशन केल्याने युवकाचा मृत्यू

तेल्हारा: तालुक्यातील दानापूर येथील १८ वर्षीय युवक विशाल संजय वानखडे याने विष प्राशन केल्याने त्याचा ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना ७ मार्च रोजी सकाळी घडली. तेल्हारा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

सावरगाव-कवठा रस्त्याची दुरवस्था

अकोट: तालुक्यातील सावरगाव विटाळी-कवठा बु. रस्त्याची दुरवस्था झाली असून, वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघाताच्या घटना घडत आहेत. रस्त्यावरील वर्दळ पाहता, रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी होत आहे.

कारची दुचाकीला धडक

तेल्हारा : येथील बोडखे डीएड कॉलेजसमोर भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याची घटना ७ मार्च रोजी घडली. अपघातात ज्ञानेश्वर सुरळकर (३० रा. दहीगाव अवताडे यांच्यासह एक बालक व सुरळकर यांचे सहकारी जखमी झाले. पोलिसांनी एमएच ३० एल ५७०७ क्रमांकाच्या कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.

रमाई घरकूल योजना मार्गी लावा

माझोड : गावातील रमाई घरकूल योजनेची यादी मार्गी लावण्याची मागणी माजी सरपंच ज्योत्स्ना खंडारे यांनी सोमवारी पंचायत समितीकडे केली आहे. २०१८ मध्ये यादी तयार करून ती पंचायत समितीला पाठविली होती. ही यादी मंजूर करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

Web Title: Distribution of baby care kits at Mundgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.