निकृष्ट मक्याचे वाटप अखेर बंद!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 10:08 AM2021-04-07T10:08:27+5:302021-04-07T10:08:33+5:30
Akola News : ६ एप्रिलपासून अखेर निकृष्ट मक्याचे वाटप बंद करण्यात आले असून, या मक्याची उचलदेखील थांबविण्यात आली आहे.
अकोला : सार्वजिनक वितरण व्यवस्थेअंतर्गत रास्त भाव दुकानांमधून वाटप करण्यात येत असलेला मका निकृष्ट दर्जाचा असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून प्राप्त होत असल्याने, अकोला आणि औरंगाबाद जिल्ह्यात ६ एप्रिलपासून अखेर निकृष्ट मक्याचे वाटप बंद करण्यात आले असून, या मक्याची उचलदेखील थांबविण्यात आली आहे.
सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत रास्त भाव दुकानांमधून दरमहा पात्र शिधापत्रिकाधारकांना धान्याचे वाटप करण्यात येते. शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या निर्णयानुसार शिधापत्रिकाधारकांना वाटप करण्यात येत असलेल्या धान्यामध्ये गव्हाचे वाटप कमी करून गत १० मार्चपासून राज्यात मका व ज्वारीचे वाटप सुरू करण्यात आले. एक रुपया प्रतिकिलो दराने मका व ज्वारीचे वाटप करण्यात येत आहे. परंतु रास्त भाव दुकानांमधून वाटप करण्यात येत असलेला मका निकृष्ट दर्जाचा असल्याच्या तक्रारी शिधापत्रिकाधारकांकडून होत असल्याने, अकोला व औरंगाबादसह इतरही काही जिल्ह्यात निकृष्ट मक्याचे वाटप बंद करण्यात आले. अकोला जिल्ह्यात ६ एप्रिलपासून निकृष्ट मक्याचे वाटप बंद करण्यात आले असून, शिधापत्रिकाधारकांना वाटप करण्यासाठी बाहेरच्या जिल्ह्यातून करण्यात येत असलेली मक्याची उचल थांबविण्यात आली आहे.
सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत जिल्ह्यातील रास्त भाव दुकानांमधून वाटप करण्यात येत असलेला मका निकृष्ट दर्जाचा असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात ६ एप्रिलपासून मक्याचे वाटप बंद करण्यात आले असून, मक्याची उचल थांबविण्यात आली आहे.
- बी. यू. काळे
जिल्हा पुरवठा अधिकारी, अकोला.