लोकमत लोकप्रज्ञा पुरस्काराचे वितरण: मान्यवरांनी केले मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2018 12:24 PM2018-12-30T12:24:33+5:302018-12-30T12:26:30+5:30

मुलांची प्रज्ञा अन् पालकांचा पाठिंबा या बळावर प्रज्ञावंत विद्यार्थी घडतो, असा मोलाचा सल्ला लोकमत ‘लोकप्रज्ञा’ पुरस्कार वितरण सोहळ्यात मान्यवर वक्त्यांनी दिला.

 Distribution of Lokmat Lok Pragya prize: Guidance by celebrities | लोकमत लोकप्रज्ञा पुरस्काराचे वितरण: मान्यवरांनी केले मार्गदर्शन

लोकमत लोकप्रज्ञा पुरस्काराचे वितरण: मान्यवरांनी केले मार्गदर्शन

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : विद्यार्थ्यांनी आपल्यातील प्रतिभेचा, आवडीचा कल ओळखून त्या विषयात अधिकाधिक ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न केला पाहिजे, तर पालकांनी आपल्या पाल्यातील प्रज्ञा ओळखून त्याला प्रोत्साहन दिले पाहिजे, त्यासाठी मदत केली पाहिजे. केवळ अपेक्षांचे ओझे ठेवून चालणार नाही. मुलांची प्रज्ञा अन् पालकांचा पाठिंबा या बळावर प्रज्ञावंत विद्यार्थी घडतो, असा मोलाचा सल्ला लोकमत ‘लोकप्रज्ञा’ पुरस्कार वितरण सोहळ्यात मान्यवर वक्त्यांनी दिला.
‘एमआयडीसी’स्थित लोकमत भवनमध्ये लोकप्रज्ञा पुरस्कार वितरण सोहळा शनिवारी पार पडला. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून सहायक कामगार आयुक्त आर. डी. गुल्हाने, माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद उपस्थित होते. याप्रसंगी ‘लोकमत’ अकोला आवृत्तीचे सहायक महाव्यवस्थापक आलोककुमार शर्मा, ‘लोकमत समाचार’चे प्रभारी अरुणकुमार सिन्हा व ‘लोकमत’चे मुख्य उपसंपादक राजेश शेगोकार मंचावर उपस्थित होते. प्रारंभी ‘लोकमत’चे संस्थापक अध्यक्ष स्व. जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या प्रतिमेचे पूजन, तसेच मान्यवर आणि उपस्थित विद्यार्थ्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यावेळी गुल्हाने यांनी विद्यार्थ्यांना करिअरच्या संधी किती विस्तारत आहेत, याची जाणीव करून दिली. मेडिकल, इंजिनअरिंग अशा चाकोरीबद्ध अभ्यासक्रमापेक्षाही अनेक अभ्यासक्रम उपलब्ध असून, त्याची माहिती आपणापर्यंत पोहोचत नाही. त्यासाठी पालकांनी अशा वेगवेगळ्या क्षेत्रांचा शोध घेऊन आपल्या पाल्याचा कल जाणून घ्यावा, असे आवाहन केले. शिक्षणाधिकारी मुकुंद यांनी प्रज्ञावंतांचे कौतुक करून चांगल्या शिक्षणाची गरज अधोरेखित केली. पालकांनी आपल्या पाल्याविषयी सजग असलेच पाहिजे; मात्र त्याची क्षमता ओळखावी, केवळ अपेक्षांचे ओझे टाकू नये, असे आवाहन केले. ‘लोकमत’ परिवाराने सुरू केलेला हा ‘लोकप्रज्ञा’ पुरस्कार विद्यार्थ्यांसाठी प्रेरक असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.
‘लोकमत’चे सहायक महाव्यवस्थापक आलोककुमार शर्मा यांनीही विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या. अरुणकुमार यांनीही मार्गदर्शन केले. यानंतर मान्यवरांच्या हस्ते गुणवंतांना गौरविण्यात आले. एकूण ६५ विजेत्यांपैकी २९ विद्यार्थ्यांना रोख रक्कम, भेटवस्तू, प्रमाणपत्र तसेच ३६ विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रासह भेटवस्तू प्रदान करण्यात आल्या.
प्रशासन अधिकारी रवींद्र येवतकर यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमामागील उद्देश कथन केला. संचालन रश्मी राजपूत यांनी केले.

 

Web Title:  Distribution of Lokmat Lok Pragya prize: Guidance by celebrities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.