जिल्ह्यात मका, ज्वारीचे वितरण रेंगाळले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:25 AM2021-02-27T04:25:06+5:302021-02-27T04:25:06+5:30
सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत अंत्योदय अन्न योजनेंतर्गत शिधापत्रिकाधारक आणि प्राधान्य गटातील शिधापत्रिकाधारकांना दरमहा रास्तभाव दुकानांमधून गहू व तांदूळ इत्यादी ...
सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत अंत्योदय अन्न योजनेंतर्गत शिधापत्रिकाधारक आणि प्राधान्य गटातील शिधापत्रिकाधारकांना दरमहा रास्तभाव दुकानांमधून गहू व तांदूळ इत्यादी धान्याचे वितरण करण्यात येते. त्यामध्ये गहू वाटपाचे प्रमाण कमी करून अंत्योदय अन्न योजनेंतर्गत प्रती शिधापत्रिका १० किलो ज्वारी व पाच किलो मका आणि प्राधान्य गटातील शिधापत्रिकाधारकांना प्रती व्यक्ती एक किलो मका वितरित करण्याचा निर्णय शासनाच्या पुरवठा विभागाने गत जानेवारीमध्ये घेतला. त्यानुसार शिधापत्रिकाधारकांना फेब्रुवारीमध्ये मका व ज्वारीचे वितरण करायचे होते. त्यासाठी मका व ज्वारीचा साठा (नियतन) मंजूर करण्यात आला; परंतु मंजूर धान्यसाठा उपलब्ध झाला नसल्याने, जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांना फेब्रुवारीमध्ये मका व ज्वारीचे वितरण सुरू करण्यात आले नाही. जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाने गत दोन दिवसांपासून शेगाव येथील शासकीय धान्य गोदाम येथून १९ हजार क्विंटल मका आणि २ हजार ६० क्विंटल ज्वारी इत्यादी धान्याची उचल सुरू केली आहे. धान्याची उचल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांना मार्चमध्ये मका व ज्वारीचे वितरण सुरू करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारक लाभार्थींना मका व ज्वारीचे वितरण करण्यासाठी शेगाव येथील शासकीय धान्य गोदामातून धान्याची उचल सुरू करण्यात आली आहे. येत्या मार्चमध्ये शिधापत्रिकाधारकांना रास्तभाव दुकानांमधून मका व ज्वारीचे वितरण सुरू करण्यात येणार आहे.
बी.यू.काळे
जिल्हा पुरवठा अधिकारी.