आॅफलाइन धान्य वाटपाचा १६ जिल्ह्यात धडाका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 03:11 PM2019-09-24T15:11:26+5:302019-09-24T15:11:46+5:30
राज्यात एप्रिल ते डिसेंबर २०१८ या काळात ५८ लाख क्विंटल धान्याचे आॅफलाइन वाटप झाले.
- सदानंद सिरसाट
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: सार्वजनिक वितरण व्यवस्थेतून लाभार्थींना धान्य वाटप आॅनलाइन करण्याच्या पद्धतीला राज्यातील पुरवठा यंत्रणेने खो दिला आहे. विशेष म्हणजे, मार्चपर्यंत आॅफलाइन वाटप झालेल्या ५८ लाख क्विंटल धान्याच्या हिशेब मागवत, हा प्रकार तातडीने बंद करण्याचा आदेश केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा विभागाने मार्च २०१९ मध्ये दिला. त्या आदेशालाही धाब्याला बसवत १६ जिल्ह्यांमध्ये आॅफलाइन वाटपाचा धडाका सुरू असल्याचे आॅगस्ट महिन्यातील वाटपातून पुढे आले आहे.
आधार लिंक शिधापत्रिकेतील लाभार्थींची ओळख आॅनलाइन पटवून धान्य वाटपाची आॅनलाइन ‘एई-पीडीएस’प्रणाली शासनाने तयार केली. मे २०१८ पासून सर्वच जिल्ह्यांत आॅनलाइन धान्य वाटप सुरू झाले. त्यानंतरही राज्यात एप्रिल ते डिसेंबर २०१८ या काळात ५८ लाख क्विंटल धान्याचे आॅफलाइन वाटप झाले. त्यावेळी राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये हा प्रकार सातत्याने घडला. त्याबाबत ५ मार्च २०१९ च्या अहवालानुसार केंद्रीय ग्राहक संरक्षण, अन्न व नागरी पुरवठा विभागाचे संचालक डी. के. गुप्ता यांनी महाराष्ट्राच्याअन्न व नागरी पुरवठा प्रधान सचिवांना पडताळणी करून कारणे स्पष्ट करण्याचा आदेश १४ मार्च रोजी दिला होता. त्यानंतरही राज्यात आॅफलाइन धान्य वाटपाचा धडाका असल्याचे आॅगस्ट २०१९ च्या अहवालातून पुढे आले. १६ जिल्ह्यांत ही परिस्थिती गंभीर आहे. आधार लिंक कार्डधारकांना पॉस मशीनद्वारे आॅनलाइन धान्य वाटपाचे प्रमाण ४० ते ६७ टक्केच आहे. उर्वरित धान्याचे वाटप कोणाला होते, ही बाब धान्याचा काळाबाजार किती प्रमाणात होत आहे, हे अधोरेखित करणारी आहे. त्यामुळेच पुरवठा विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांनी सर्वच पुरवठा उपायुक्तांना कारवाईचा इशारा दिला आहे.
आॅफलाइनचा मलिदा लाटणारे जिल्हे
सिंधुदुर्ग-६२ टक्के, ठाणे-६१, रायगड-४६,नंदुरबार-५५, अहमदनगर-५८, जळगाव-५३, धुळे-६०, नाशिक-४९, पुणे-४५, सोलापूर शहर-४९, हिंगोली-५१, परभणी-४४, अमरावती-५९, बुलडाणा-६७, यवतमाळ-५९, गडचिरोली-५१ टक्के धान्य आॅनलाइन तर उर्वरित आॅफलाइन दिले जाते.
असा होतो काळाबाजार
आधार लिंक होऊनही पॉस मशीनद्वारे पडताळणी अशक्य असलेल्यांना पुरवठा विभागाने नेमून दिलेल्या सक्षम अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत धान्य वाटपाची सूट देण्यात आली. या संधीचा फायदा धान्याचा काळाबाजार करण्यासाठीच अधिक झाला. सरासरी १० ते २५ टक्के धान्य घेण्यासाठी लाभार्थी येतच नाहीत. प्रत्यक्ष लाभार्थी गायब असतानाही ‘नॉमिनी’च्या नावे आॅफलाइन धान्याची उचल करून त्याचा काळाबाजार केला जातो.