जिल्हा परिषद विषय समिती वाटप, समित्यांची रचनाही लवकरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2020 12:20 PM2020-02-03T12:20:40+5:302020-02-03T12:20:59+5:30
दोन विषय समिती सभापती पदांवर निवड झालेल्या सभापतींना समितीचे वाटप जिल्हा परिषदेच्या विशेष सभेत करावे लागणार आहे.
- सदानंद सिरसाट
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षांसह दोन सभापतींना विषय समित्यांचे वाटप करण्यासोबतच १० समित्यांची रचना करण्यासाठीची विशेष सभा येत्या १५ फेब्रुवारीपर्यंत बोलावण्यात यावी, असा प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागाने जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष प्रतिभा भोजणे यांना दिला आहे. अध्यक्षांनी सभेची तारीख ठरवल्यानंतर सदस्यांना नोटीस दिल्या जातील, असे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी व सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूरज गोहाड यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेच्या सभापतींची निवड प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता दोन विषय समिती सभापती पदांवर निवड झालेल्या सभापतींना समितीचे वाटप जिल्हा परिषदेच्या विशेष सभेत करावे लागणार आहे. त्या सभेतच १० समित्यांवर सदस्यांची निवड केली जाणार आहे. त्या समित्यांमध्ये सत्ताधारी पक्षासोबतच विरोधी पक्षाच्या सदस्यांचीही वर्णी लागणार आहे. सभागृहात बहुमताने हा निर्णय घ्यावा लागणार आहे. त्यासाठी आता महाविकास आघाडीसोबतच भाजप कोणती भूमिका घेते, यावरही सभापतींना कोणत्या दोन विषय समित्या दिल्या जाणार आहेत, हे ठरणार आहे.
जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदी निवड झालेल्या सावित्री राठोड, सभापतीपदी निवड झालेले चंद्रशेखर पांडे गुरुजी, पंजाबराव वडाळ यांना सहा विषय समित्यांपैकी प्रत्येकी दोन समित्या दिल्या जाणार आहेत. आधीच्या रचनेत उपाध्यक्षांकडे बांधकाम व आरोग्य समिती होती. तर उर्वरित दोनपैकी एका सभापतीकडे कृषी व पशुसंवर्धन तर दुसऱ्या सभापतीला अर्थ व शिक्षण समित्यांचे वाटप झाले होते. त्यापैकी कृषी व पशुसंवर्धन समिती अपक्ष माधुरी गावंडे यांना तर अर्थ व शिक्षण समिती राष्ट्रवादी काँग्रेसचे पुंडलिकराव अरबट यांच्याकडे होती. यावेळी या समित्यांच्या जोड्या कशा पद्धतीने तयार करायच्या हे सत्ताधारी भारिप-बमसंचे पदाधिकारी ठरवणार आहेत. त्यामुळे समित्यांची जोडी तुटण्याचीही शक्यता आहे.
विषय समित्यांमध्ये सदस्यांची निवड
जिल्हा परिषदेच्या सर्वच विषय समित्यांमध्ये किमान ७ व त्यापेक्षा अधिक सदस्यांची निवड केली जाते. त्यामुळे कोणता सदस्य कोणत्या समितीवर जाईल, याचीही रणनीती सत्ताधारी, विरोधी सदस्यांकडून ठरवली जाणार आहे. त्यामध्ये समाजकल्याण, महिला व बालकल्याण, आरोग्य, बांधकाम, शिक्षण, अर्थ, कृषी, पशुसंवर्धन, जलव्यवस्थापन या समित्या आहेत. त्या सर्वच समित्यांवर सदस्यांची निवड विशेष सभेत केली जाणार आहे.
पांडे गुरुजी यांना अर्थ व शिक्षण?
जिल्हा परिषदेत सलग चौथ्यांदा निवडून आलेले सभापती चंद्रशेखर पांडे गुरुजी यांना अर्थ व शिक्षण समिती मिळण्याची चर्चा आहे. तर पंजाबराव वडाळ यांना कृषी व पशुसंवर्धन दिल्यास उपाध्यक्षांकडे पूर्वीप्रमाणेच असलेल्या आरोग्य व बांधकाम सावित्री राठोड यांच्याकडे दिल्या जातील. जलव्यवस्थापन समितीचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून अध्यक्ष प्रतिभा भोजणे यांच्याकडेच समिती राहणार आहे.