पालकमंत्र्यांसह जिल्हा प्रशासन शेतात; करपलेल्या पिकांची पाहणी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 01:34 PM2019-07-24T13:34:25+5:302019-07-24T13:34:51+5:30
पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी आयुष प्रसाद यांनी थेट शेतात भेट देऊन पीक परिस्थिती जाणून घेतली.
अकोला: जिल्ह्यात तुरळक पाऊस झाल्यामुळे अनेक भागातील पिके करपली आहेत. अपुऱ्या पावसामुळे जमिनीत चार ते पाच इंचापर्यंत ओलावा असून, चार-पाच दिवसात पाऊस न आल्यास पिके जास्त दिवस तग धरू शकणार नाही, अशी स्थिती आहे. अकोला तालुक्यातील कौलखेड जहागीर, जांभा, पळसो व दहीगाव गावंडे गावांच्या शिवारात मंगळवारी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी आयुष प्रसाद यांनी थेट शेतात भेट देऊन पीक परिस्थिती जाणून घेतली.
सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जनता तक्रार निवारण दिनामध्ये अकोला तालुक्यातील कौलखेड जहागीर येथील सरपंच, उपसरपंच यांच्या नेतृत्वाखालील गावकऱ्यांनी चालू हंगामामध्ये शेतकºयांनी पेरणी केली असून, पावसाअभावी पिके करपली असल्याचे निवेदन देऊन प्रत्यक्ष पाहणी करण्याची विनंती केली होती. त्या विनंतीनुसार २३ जुलै रोजी पालकमंत्र्यांसह अधिकाºयांनी अकोला तालुक्यातील कौलखेड जहागीर, जांभा, पळसो व दहीगाव गावंडे या गावातील शेत शिवाराला भेट दिली.
कौलखेड जहागीर येथील विजय गावंडे, पूर्णाजी तायडे यांच्या शेतात प्रत्यक्ष भेट देऊन कपाशी व सोयाबीन पिकाची पाहणी केली. या भागात तुरळक पाऊस झाल्यामुळे या भागातील पिके अपुºया पावसामुळे काही ठिकाणी करपली असल्याचे निदर्शनास आले आहे. यावेळी त्यांच्या समवेत उपसरपंच विनायकराव तायडे, डॉ. पुरुषोत्तम तायडे, प्रदीप तायडे, अनिल तायडे, निर्मला गावंडे, आशा गावंडे, मनोज तायडेसह इतर ग्रामस्थ होते.
जांभा येथील गणेश ठोकळ यांच्या शेतात कपाशी पिकाची प्रत्यक्ष भेट देऊन पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी पाहणी केली. या भागातही थोड्या अधिक प्रमाणात तशीच परिस्थिती आहे. यावेळी पालकमंत्री यांच्या समवेत जांभा येथील विनोद ठोकळ, संतोष मानकर, श्रीकांत चिटके यांची उपस्थिती होती. त्यानंतर पालकमंत्री यांनी पळसो येथील अकुंश बढे यांच्या शेतात भेट दिली तसेच पळसो येथील महिला बचत गटाच्या महिलांशी पालकमंत्री यांनी चर्चा केली. दहीगाव गावंडे येथील विजय गावंडे यांच्या शेताला भेट दिली. यावेळी पळसो येथील दत्ता बोर्ड, महेंद्र काळे, अरुण चौधरी, नंदा लाडे आदीसह ग्रामस्थांची व दहीगाव गावंडे येथील पांडुरंग गावंडेसह इतर ग्रामस्थांची उपस्थिती होती.