जिल्हा प्रशासनाचे निर्देश धाब्यावर; अन्नधान्याचे दर वाढविले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2020 01:32 PM2020-03-27T13:32:41+5:302020-03-27T13:32:48+5:30
अवघ्या दोनच दिवसांत किराणा व्यावसायिकांनी अन्नधान्याचे दर वाढविले आहेत.
अकोला: देशात कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २३ मार्च रोजी पुढील २१ दिवसांकरिता ‘लॉकडाऊन’ची घोषणा करताच शहरातील काही किराणा व्यावसायिकांकडून नफेखोरीला प्राधान्य दिले जात असल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश धाब्यावर बसवित अवघ्या दोनच दिवसांत किराणा व्यावसायिकांनी अन्नधान्याचे दर वाढविले आहेत. संबंधित व्यावसायिकांवर कारवाईचा आदेश दिलेल्या जिल्हा पुरवठा अधिकारी बबनराव काळे यांना विचारणा केली असता पथक गठित केल्यानंतर गुरुवारी सायंकाळपासून कारवाईला सुरुवात करणार असल्याचे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
जीवघेण्या कोरोना विषाणूच्या पृष्ठभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २२ मार्च रोजी कलम १४४ अन्वये जमावबंदी व २३ मार्च रोजी थेट संचारबंदी लागू केली. अशा संकटाचा सर्वांनी मुकाबला करण्याची गरज असताना जीवनावश्यक वस्तू व अन्नधान्याची विक्री करणाºया व्यापाऱ्यांनी व किराणा व्यावसायिकांनी साठेबाजी करीत अवघ्या दोनच दिवसांत अन्नधान्याचे दर वाढविल्याचे चित्र समोर आले आहे. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाकडे अनेक तक्रारी प्राप्त झाल्या असून, ही बाब गंभीरतेने घेत जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी अन्नधान्याचे दर वाढविण्यासोबतच साठेबाजी करणाºया व्यावसायिकांचे गोदाम, प्रतिष्ठाने, दुकानांची आकस्मिक तपासणी करण्याचे निर्देश २५ मार्च रोजी जिल्हा पुरवठा अधिकारी बबनराव काळे यांना दिले होते. यादरम्यान, साठेबाजी करणे व भाववाढ करण्याच्या मुद्यावर गुरुवारी जिल्हाधिकाºयांनी त्यांच्या दालनात होलसेल किराणा मर्चंट असोसिएशनच्या पदाधिकाºयांची बैठक घेतली. शहरालाच नव्हे, तर संपूर्ण जिल्ह्याला पुरवठा होईल, इतका अन्नधान्याचा साठा उपलब्ध असताना भाववाढ करण्याची गरज नसल्याच्या मुद्यावर चर्चा झाल्याची माहिती आहे. त्यावर काही विशिष्ट व्यापारी व किराणा व्यावसायिकांनी भाववाढ केल्याची बाब समोर आली.
‘डीएसओं’च्या कारवाईकडे लक्ष
शहरात अन्नधान्याचे दर वाढविल्याचे समोर आल्यानंतर जिल्हाधिकारी पापळकर यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी बबनराव काळे यांना संबंधित व्यावसायिकांवर कारवाईचे निर्देश दिले आहेत. याप्रकरणी ‘डीएसओ’ काळे नेमक्या कोणत्या व्यावसायिकांवर कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
चढ्या दराने विक्री सुरूच!
शहराच्या विविध भागातील किराणा व्यावसायिक दुकानात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा उपलब्ध नसल्याचे सांगत चढ्या दराने विक्री करीत आहेत. वाढीव दराने विक्री करीत असल्याने ग्राहकांना देयकसुद्धा दिले जात नसल्याचे समोर आले आहे. संबंधितांच्या तक्रारी महापालिका व जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आल्याची माहिती आहे.