अकोल्यात ३० मार्च ते ३ एप्रिल या कालावधीत जिल्हा कृषी महोत्सव
By Atul.jaiswal | Published: March 29, 2018 01:41 PM2018-03-29T13:41:13+5:302018-03-29T16:00:18+5:30
अकोला: आधुनिक कृषि तंत्रज्ञानाचा शाश्वत पध्दतीने अवलंब केल्यास शेतकरी आर्थिक दृष्टया उन्नत होऊन जागतिक पातळीवरील स्पर्धाक्षम वातावरणात आपले स्थान सिध्द करु शकतील, या करीता शुक्रवार, दिनांक ३० मार्च ते ३ एप्रिल २०१८ या कालावधीत डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ परिसर, मुर्तिजापुर रोड, अकोला या ठिकाणी भव्य जिल्हा कृषि महोत्सव - २०१८ चे आयोजन कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), कृषि विभाग व कृषि विद्यापीठ यांचे संयुक्त विद्यमाने करण्यात येत आहे.
अकोला: आधुनिक कृषि तंत्रज्ञानाचा शाश्वत पध्दतीने अवलंब केल्यास शेतकरी आर्थिक दृष्टया उन्नत होऊन जागतिक पातळीवरील स्पर्धाक्षम वातावरणात आपले स्थान सिध्द करु शकतील, या करीता शुक्रवार, दिनांक ३० मार्च ते ३ एप्रिल २०१८ या कालावधीत डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ परिसर, मुर्तिजापुर रोड, अकोला या ठिकाणी भव्य जिल्हा कृषि महोत्सव - २०१८ चे आयोजन कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), कृषि विभाग व कृषि विद्यापीठ यांचे संयुक्त विद्यमाने करण्यात येत आहे. या महोत्सवात शेतकरी ते ग्राहक थेट विक्री या पध्दतीने शेतमालाची विक्री होणार आहे.
या कृषि महोत्सवाचे उदघाटन पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या हस्ते सकाळी 11 वाजता होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून खासदार संजय धोत्रे हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी आमदार सर्वश्री गोवर्धन शर्मा, प्रकाश भारसाकळे, हरिष पिंपळे, रणधिर सावरकर, बळीराम सिरसकार व गोपीकिशन बाजोरीया यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
जिल्हा कृषि महोत्सवाचे उदेृश हा कृषि विषयक तंत्रज्ञान व शासकीय योजना शेतक-यांपर्यंत पोहचविणे,शेतकरी शासन आणि संशोधन विस्तार विपणन साखळी सक्षम करणे, समूह / गट स्थापित करुन शेतकरी उत्पादन कंपन्यांचे सक्षमीकरण करणे, शेतकरी ते ग्राहक थेट विक्री साखळी विकसीत करणे हा होय. तसेच कृषि विषयक परिसंवाद आयोजीत करुन शेतक-यांचे समस्यांचे निराकरण करणे, विक्रेता ते खरेदीदार संम्मेलन आयोजीत करुन बाजाराभिमुख कृषि उत्पादनास चालना देणे असा आहे.
जिल्हा कृषि महोत्सवाचे वैशिष्टये
जिल्हयात कृषि आणि पुरक व्यवसायाशी निगडीत एकात्मिक शेती पध्दतीवर आधारीत या पाच दिवसीय कृषि प्रदर्शनात शासनाच्या विविध योजना / उपक्रमांची माहिती देणारे 30 शासकीय दालने, शेतीशी निगडीत खाजगी कंपन्या, उद्योजक, शेतकरी बचत गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांचे एकूण 150 दालने, सेंद्रिय शेतमालाची उत्पादक ते ग्राहक थेट विक्री,कृषि शास्त्रज्ञ, कृषि व संलग्न विभागातील तज्ञ अधिकारी, अनुभवी शेतकरी, नामांकित वक्ते यांची व्याख्याने/ चर्चासत्रे, शेतक-यांनी पिकविलेले धान्य, डाळी, सेंद्रिय माल व इतर शेतमाल थेट शेतक-यांकडून रास्त दरात खरेदीसाठी उपलब्ध, कृषि निविष्ठा, कृषि तंत्रज्ञान व सिंचन इ. यंत्रसामुग्रीचे विविध कंपन्यांचे स्टॉल्स, पशु पक्षी प्रदर्शन, जल साक्षरता ग्राम, गुलाबी बोंड अळींचे व्यवस्थापन आणि सेंद्रिय शेतीचे लाईव्ह मॉडेलचे स्टॉल, खरेदीदार - विक्रेता सम्मेलन, गटांमार्फत खाद्य पदार्थांचे स्टॉल्स ही आहेत.
या कृषि महोत्सवाच्या माध्यमातून शेतक-यांच्या शेतातील उत्पादीत केलेला कृषि माल ग्राहकांना योग्य किंमतीत उपलब्ध होणार आहे. मध्यस्थांशिवाय शेतमालाची खरेदी- विक्री होत असल्याने शेतकरी व ग्राहक या दोघांनाही याचा फायदा होणार आहे. या माध्यमातुन शेतक-यांना शहरातील कायमचा व हक्काचा ग्राहक मिळणे अपेक्षीत आहे. शहरातील ग्राहकांनासुध्दा शेतीवरील स्वच्छ व खात्रीशीर शेतमाल मिळणार आहे. महोत्सवातील विक्रीची वेळ सकाळी 9.00 ते रात्री 8.00 अशी राहील.
जास्तीत-जास्त शेतकरी व नागरीकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामुर्ती, प्रकल्प संचालक, आत्मा, सुरेश बाविस्कर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी राजेन्द्र निकम यांनी केले आहे.