अकोला जिल्ह्यात अडीच महिन्यांत केवळ १९ हजार शेतकऱ्यांना कर्ज वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 03:13 PM2018-06-18T15:13:40+5:302018-06-18T15:13:40+5:30
अकोला : खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपाचे काम गत १ एप्रिलपासून बँकांमार्फत सुरू करण्यात आले; मात्र १४ जूनपर्यंत अडीच महिन्यांच्या जिल्ह्यातील केवळ १९ हजार ६५१ शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप करण्यात आले.
- संतोष येलकर
अकोला : खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपाचे काम गत १ एप्रिलपासून बँकांमार्फत सुरू करण्यात आले; मात्र १४ जूनपर्यंत अडीच महिन्यांच्या जिल्ह्यातील केवळ १९ हजार ६५१ शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप करण्यात आले. खरीप पेरण्या तोंडावर असल्या तरी जिल्ह्यात पीक कर्ज वाटपाचे प्रमाण पुढे सरकत नसल्याची बाब समोर येत आहे.
यावर्षीच्या खरीप हंगामात अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १ हजार ३३ कोटी ४८३ रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनामार्फत निश्चित करण्यात आले आहे. गत १ एप्रिलपासून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकसह राष्ट्रीयीकृत बँका व व्यापारी बँकांमार्फत पीक कर्ज वाटपाची प्रक्रिया सुरू करण्यात आली. पावसाळा सुरू झाला असून, खरीप पेरण्या तोंडावर आल्या; मात्र बँकांमार्फत पीक कर्जाचे वाटप संथ गतीने सुरू असल्याने गत अडीच महिन्यांच्या कालावधीत अकोला जिल्ह्यातील एकूण खातेदार तीन लाख शेतकऱ्यांपैकी केवळ १९ हजार ६५१ शेतकऱ्यांना १७९ कोटी ५५ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले. पीक कर्ज वाटपाचे प्रमाण जलद गतीने पुढे सरकत नसल्याने खरीप पेरण्यांपूर्वी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कर्जाचा लाभ मिळणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
आदेश-निर्देशानंतरही पीक कर्ज वाटप १३ टक्क्यावरच!
जिल्ह्यात पीक कर्ज वाटपाचे प्रमाण अत्यल्प असल्याच्या पृष्ठभूमीवर कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकºयांसह सर्व पात्र शेतकºयांना तातडीने पीक कर्जाचे वाटप करून, कर्ज वाटपाचे देण्यात आलेले उद्दिष्ट पूर्ण करण्याचा आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी जिल्ह्यातील बँकांना दिला. कर्ज वाटपात टाळाटाळ करणाऱ्या बँकांच्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही जिल्हाधिकाºयांनी दिला; परंतु वारंवार आदेश-निर्देश दिल्यानंतरही १४ जूनपर्यंत जिल्ह्यातील पीक कर्ज वाटपाचे प्रमाण केवळ १३ टक्क्यांवरच असल्याची स्थिती आहे.
पीक कर्ज वाटपाचे असे आहे वास्तव!
-कर्ज वाटपाचे उद्दिष्ट : १ हजार ३३ कोटी ४८३ रुपये
-१४ जूनपर्यत कर्ज वाटप : १७९ कोटी ५५ लाख रुपये
-कर्ज वाटपाची टक्केवारी : १३ टक्के
-कर्ज वाटप केलेले शेतकरी : १९ हजार ६५१
पीक कर्ज वाटपाच्या उद्दिष्टपूर्तीवर प्रश्नचिन्ह!
खरीप हंगामासाठी पेरणी सुरू होण्यापूर्वी शेतकºयांना पीक कर्ज मिळणे आवश्यक आहे; परंतु पावसाळा सुरू झाला असून, पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर जिल्ह्यात खरीप पेरण्या सुरू होणार आहेत.खरीप पेरण्या तोंडावर असताना आतापर्यंत केवळ १३ टक्के पीक कर्जाचे वाटप करण्यात आल्याने, यावर्षी जिल्ह्यात खरीप पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण होणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.