जिल्हा वार्षिक योजना : चार महिन्यांत विकास कामांवर केवळ ३.६५ कोटी खर्च!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 12:46 PM2018-08-20T12:46:41+5:302018-08-20T12:49:05+5:30
अकोला : जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत जिल्ह्यातील विविध विकास कामांसाठी १३९ कोटी ५१ लाख रुपयांचा निधी मंजूर असला, तरी गत मार्च ते जुलै अखेरपर्यंत या चार महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यातील विकास कामांवर केवळ ३ कोटी ६५ लाख ८० हजार रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे.
अकोला : जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत जिल्ह्यातील विविध विकास कामांसाठी १३९ कोटी ५१ लाख रुपयांचा निधी मंजूर असला, तरी गत मार्च ते जुलै अखेरपर्यंत या चार महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यातील विकास कामांवर केवळ ३ कोटी ६५ लाख ८० हजार रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. त्यामुळे विकास कामांचा उर्वरित १३५ कोटी ८५ लाख रुपयांचा निधी केव्हा खर्च होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत सन २०१८-१९ या वर्षात कृषी व संलग्न सेवा, ग्राम विकास, सामाजिक व सामूहिक सेवा, पाटबंधारे व पूर नियंत्रण, ऊर्जा, उद्योग व खाण, परिवहन, सामान्य आर्थिक सेवा, सामान्य सेवा आणि नावीन्यपूर्ण योजना, बळकटीकरण व मूल्यमापन इत्यादी क्षेत्रातील विविध विकास कामांसाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत १३९ कोटी ५१ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. उपलब्ध निधीपैकी संबंधित यंत्रणांमार्फत गत मार्च ते जुलै अखेरपर्यंत या चार महिन्यांच्या कालावधीत केवळ ३ कोटी ६५ लाख ८० हजार रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विकास कामांचा उर्वरित १३५ कोटी ८५ लाख २ हजार रुपयांचा निधी केव्हा खर्च होणार आणि विकास कामे केव्हा मार्गी लागणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
आठ महिन्यांत १३५.८५ कोटी निधी खर्चाचे आव्हान!
जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत विविध विकास कामांसाठी मंजूर असलेल्या निधीपैकी जुलै अखेरपर्यंत ३ कोटी ६५ लाख ८० हजार रुपयांचा निधी खर्च करण्यात आला असून, उर्वरित १३५ कोटी ८५ लाख रुपयांचा निधी खर्च होणे अद्याप बाकी आहे. उपलब्ध निधी येत्या मार्च अखेरपर्यंत खर्च करावा लागणार आहे. त्यानुषंगाने येत्या आठ महिन्यांत विकास कामांचा १३५ कोटी ८५ लाख रुपयांचा निधी खर्च करण्याचे आव्हान संबंधित यंत्रणांसमोर आहे.