वर्धा, बुलडाणा, नागपूरच्या जिल्हा बँका आता राज्य सहकारी बँक चालविणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 12:35 PM2019-02-20T12:35:45+5:302019-02-20T12:36:13+5:30
अकोला: राज्यात डबघाईस आलेल्या नव्हे, तर बंद पडलेल्या जिल्हा बँका आता राज्य सहकारी बँक चालविणार आहे. त्याचा प्रयोग वर्धा, बुलडाणा आणि नागपूरच्या जिल्हा बँकांपासून होणार आहे.
अकोला: राज्यात डबघाईस आलेल्या नव्हे, तर बंद पडलेल्या जिल्हा बँका आता राज्य सहकारी बँक चालविणार आहे. त्याचा प्रयोग वर्धा, बुलडाणा आणि नागपूरच्या जिल्हा बँकांपासून होणार आहे. अशी माहिती राज्य सहकारी बँकेचे मुख्य प्रशासक आणि महाराष्ट्र फेडरेशनचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी दिली. मंगळवारी अकोल्यात आयोजित एका पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.
९० टक्के जिल्हा बँकांची परिस्थिती वाईट आहे. शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करण्यासोबत विविध योजना थेट पोहोचविण्यासाठी आता राज्य सहकारी बँक पुढाकार घेत आहे. जिल्हा बँकांना केवळ काही टक्क्यांचे कमिशन दिले जाईल, असेही ते येथे बोलले. प्रधानमंत्री आवास योजना जिल्हा बँकांना लागू का नाही, असा प्रश्न उपस्थित केला असता, अनास्कर यांनी राष्ट्रीयीकृत बँकेत केंद्र शासनाचे भागभांडवल असते. त्यामुळे अशा योजना जिल्हा बँकेतून राबविल्या जात नाही. तो धोरणात्मक विषय असल्याचेही त्यांनी सांगितले. नागरी सहकारी बँकांचे पदाधिकारी संचालक आणि अधिकारी यांच्या एक दिवसीय खुले चर्चासत्रात प्रमुख अतिथी म्हणून अनास्कर मंगळवारी अकोल्यात होते. दरम्यान, सायंकाळी त्यांनी स्थानिक पत्रकारांशी विविध विषयांवर संवाद साधला. महाराष्ट्र फेडरेशनचे संचालक संजय भेंडे, अकोला जनता बँकेचे ज्येष्ठ संचालक रमाकांत खेतान, अकोला जनता बँकेचे अध्यक्ष ग्यानचंद गर्ग, आशिष लोहिया व विलास अग्रवाल प्रामुख्याने उपस्थित होते.
जनता बँकेने दिला शहिदांना एक लाखाचा निधी!
राज्यातील सर्व अर्बन बँकांनी शहीद जवानांसाठी पुढाकार घेऊन किमान एक लाख रुपयांची मदत करावी, असा प्रस्ताव ठेवत अकोला जनता बँकेने एक लाख रुपयांची मदत जाहीर केली. जर अर्बन बँकांनी अशीच मदत केली, तर राज्यातून ४२ लाख रुपयांचा भरघोस मदत निधी आपण देऊ शकतो, असा प्रस्तावही रमाकांत खेतान यांनी येथे मांडला.