जि.प.चे ‘सीईओ’ विधळे, महाबीजचे ‘एमडी’ गमे!
By admin | Published: June 24, 2016 12:46 AM2016-06-24T00:46:42+5:302016-06-24T00:46:42+5:30
एम. देवेंदर सिंह यांची चंद्रपूरला बदली
अकोला: जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) एम. देवेंदर सिंह यांची चंद्रपूर येथे बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी जिल्हा परिषदेचे नवे सीईओ म्हणून राज्य रस्ते विकास महामंडळाचे भूसंपादन अधिकारी अरुण विधळे, तर महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाचे (महाबीज) नवे व्यवस्थापकीय संचालक (एमडी ) म्हणून आर.व्ही. गमे यांची मंगळवारी शासनामार्फत नियुक्ती करण्यात आली आहे.
विविध विभागांतर्गत राज्यातील १५ अधिकार्यांच्या बदल्या करण्यात येत असल्याचा आदेश शासनामार्फत ३१ मे रोजी काढण्यात आला. त्यामध्ये दीड वर्षांपूर्वीच अकोल्यात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून आलेले एम. देवेंदर सिंह यांची चंद्रपूर येथे याच पदावर बदली करण्यात आली आहे.
त्यांच्या जागी राज्य रस्ते विकास महामंडळाचे भूसंपादन अधिकारी अरुण विधळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महाबीजचे नवे व्यवस्थापकीय संचालक म्हणून आर.व्ही. गमे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नवे सीईओ म्हणून अकोल्यात येत असलेले अरुण विधळे यांनी यापूर्वी अकोल्यात उपविभागीय अधिकारी म्हणून काम केले होते, हे येथे उल्लेखनीय.