पाणीटंचाई कृती आराखड्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी बोलावली बैठक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:45 AM2020-12-11T04:45:30+5:302020-12-11T04:45:30+5:30
अकोला: जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी पहिल्या टप्प्यातील पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांचा कृती आराखडा जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत जिल्हाधिकारी ...
अकोला: जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी पहिल्या टप्प्यातील पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांचा कृती आराखडा जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आला आहे. त्यानुषंगाने पाणीटंचाई निवारणाच्या कृती आराखड्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी १५ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक बोलावली आहे.
जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी पहिल्या टप्प्यात ऑक्टोबर ते डिसेंबर अखेरपर्यंत या कालावधीकरिता पाणीटंचाई निवारणाचा कृती आराखडा जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने तयार केला असून, जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मान्यतेसाठी सादर केला आहे. त्यानुषंगाने पाणीटंचाई निवारणाच्या कृती आराखड्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी १५ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात संबंधित विभागाच्या अधिकऱ्यांची बैठक बोलावली आहे.जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे वरिष्ठ भूवैज्ञानिक या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
आराखड्यात २५ गावांसाठी
३६ उपाययोजना प्रस्तावित!
जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने पहिल्या टप्प्यातील पाणीटंचाई निवारणाचा कृती आराखडा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केला आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील २५ गावांसाठी पाणीटंचाई निवारणाच्या ३६ उपाययोजनांची कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत.