निगेटिव्ह रक्तगटाच्या मागणीवर जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली चिंता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2017 01:08 AM2017-07-11T01:08:53+5:302017-07-11T01:41:18+5:30

जिल्हा एड्स नियंत्रण समितीची बैठक : रक्तदानावर समाधान

District Collector expressed concern over negative blood group! | निगेटिव्ह रक्तगटाच्या मागणीवर जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली चिंता!

निगेटिव्ह रक्तगटाच्या मागणीवर जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली चिंता!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: जिल्ह्यातील रक्तदानाच्या आकडेवारीवर समाधान व्यक्त करीत, वाढत्या निगेटिव्ह रक्तगटाच्या मागणीवर जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी सोमवारी जिल्हा एड्स नियंत्रण समितीच्या बैठकीत चिंता व्यक्त केली.
जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या जिल्हा एड्स नियंत्रण समितीच्या बैठकीला प्रामुख्याने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार उपस्थित होते. जिल्ह्यातील एचआयव्ही एड््स नियंत्रण कार्यक्रमासह रक्तसुरक्षा संदर्भात कामांचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. त्यामध्ये जिल्ह्यातील रक्तदानाच्या आकडेवारीवर समाधान व्यक्त करीत, वाढत्या निगेटिव्ह रक्तगटाच्या मागणीवर जिल्हाधिकाऱ्यांनी चिंता व्यक्त केली.
गरोदर मातांच्या शस्त्रक्रिया, सिकलसेल, थॅलेसिमिया रुग्णांचे वाढते निदान, यामुळे दिवसेंदिवस रक्ताची मागणी वाढत आहे. त्यातच अशा रुग्णांचा रक्तगट निगेटिव्ह असल्यास निगेटिव्ह रक्तगट शोधणे कठीण होते.
त्यामुळे अशा बिकट परिस्थितीवर मार्ग काढण्यासाठी जिल्हास्तरावरील ‘एआयसी पोर्टल’मध्ये निगेटिव्ह रक्तदात्यांची यादी समाविष्ट करण्याची सूचना जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी यावेळी केली.
जिल्ह्यातील एकाही रुग्णाला रक्ताअभावी राहावे लागणार नाही, याबाबत दक्षता घेण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. या बैठकीला जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या अधीक्षिका डॉ. आरती कुलवाल, गुणवंत प्रशिक्षण संस्थेच्या अध्यक्ष अरुंधती सिरसाट, राष्ट्रीय आरोग्य अभियानचे कार्यक्रम व्यवस्थापक दर्शन जनईकर यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी उपस्थित होते.

वर्षभरात ४३० जण आढळले एचआयव्ही पॉझिटिव्ह!
जिल्ह्यात एप्रिल २०१६ ते मार्च २०१७ या वर्षभराच्या कालावधीत ५१ हजार २९८ जणांचे रक्त नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. त्यापैकी ४३० जण एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. त्यापैकी ४२२ रुग्णांवर मोफत उपचार सुरू असल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली. तसेच गत ते जून २०१७ या कालावधीत ९९ जण एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले असून, सन २०१६-१७ या वर्षात २१ गर्भवती मातांना आणि गत एप्रिल ते जून २०१७ या कालावधीत ५ गर्भवती मातांना एचआयव्ही एड्सची लागण झाल्याचे आढळून आल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली.

वीटभट्ट्यांवरील कामगारांची तपासणी करणार!
वीटभट्ट्यांवरील कामगारांनी टीबी, लेप्रसी, एचआयव्ही यासंबंधी तपासणी करून घेणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील वीटभट्ट्यांवरील कामगारांची तपासणी करण्यासंदर्भात तहसीलदारांना सूचना देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी या बैठकीत सांगितले.

Web Title: District Collector expressed concern over negative blood group!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.