गणपती विसर्जन मिरवणूक मार्गाची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी; रस्ते दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश
By संतोष येलकर | Published: September 23, 2023 05:39 PM2023-09-23T17:39:31+5:302023-09-23T17:39:39+5:30
अकोला शहरातील गणपती विसर्जन मिरवणूक मार्गाची जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी शुक्रवारी (दि.२२ सप्टेंबर) पाहणी केली.
अकोला: शहरातील गणपती विसर्जन मिरवणूक मार्गाची जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी शुक्रवारी (दि.२२ सप्टेंबर) पाहणी केली. विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावरील रस्ते दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित यंत्रणेला दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी अकोला शहरातील जयहिंद चौक, आगर वेस, दगडी पूल, मोहंमद अली चौक, गांधी रोड, सिटी कोतवाली चौक, गणेश घाट, आदी ठिकाणांसह गणेश विसर्जन मिरवणूक मार्गाची पाहणी केली. यावेळी त्यांच्या जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अभय डोंगरे यांच्यासह महसूल विभाग आणि महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. मिरवणूक मार्गावरील रस्ते दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करून रस्त्यांवरील विजेच्या तारा सुरक्षित उंचीवर नेण्याची कामे करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी कुंभार यांनी संबंधित यंत्रणांना यावेळी दिले.
भाविकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करण्याचे निर्देश
गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडण्यासाठी पुरेसा बंदोबस्त व भाविकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी गुरुवारी यंत्रणांना दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते.
यावेळी पोलिस अधीक्षक संदीप घुगे, निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अभय डोंगरे, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष मोतीसिंह मोहता, महासचिव सिद्धार्थ शर्मा, महानगरपालिका उपायुक्त (प्रशासन) गीता वंजारी, शहर अभियंता नीला वंजारी यांच्यासह विविध गणेशोत्सव मंडळांचे प्रतिनिधी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. गणपती विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभाग, महानगरपालिका, महावितरण, तसेच आरोग्य विभागाच्या कामांचा आढावा यावेळी घेण्यात आला. विसर्जन मार्गावर पुरेसा बंदोबस्त, रस्त्यावर खड्डे असलेल्या भागात दुरुस्तीची कामे, मोकाट जनावरांचा बंदोबस्त, पेयजल, स्वच्छतागृहे, आदी सुविधांसह वैद्यकीय पथके पुरेशा औषधसाठ्यासह उपलब्ध ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कुंभार यांनी दिले.