जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले सक्सेस पासवर्ड!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 12:33 PM2018-11-14T12:33:52+5:302018-11-14T12:34:22+5:30
अकोला : बालक दिनानिमित्त ‘लोकमत’ने शहरातील निवडक शाळांमधील विद्यार्थ्यांचा मंगळवारी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांच्याशी संवाद घडवून आणला. यावेळी विद्यार्थ्यांनी ...
अकोला : बालक दिनानिमित्त ‘लोकमत’ने शहरातील निवडक शाळांमधील विद्यार्थ्यांचा मंगळवारी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांच्याशी संवाद घडवून आणला. यावेळी विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाºयांना विविध विषयांवर प्रश्न विचारले. जिल्हाधिकाºयांनी प्रश्नांची दिलखुलास उत्तरे दिली.
प्रश्न: आयएएस परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर मुलाखतीला कसे सामोरे जायचे?
उत्तर- मुलाखतीच्या आत्मविश्वास महत्त्वाचा आहे. त्यासाठी भरपूर तयारी करावी लागते. मुलाखत घेणारे निवड समितीचे सदस्य तज्ज्ञ आणि अभ्यासू असतात. त्यांच्यासोबत खोटे बोलता येत नाही. त्यांची दिशाभूल करता येत नाही. आत्मविश्वासनाने त्यांच्या प्रश्नांना उत्तरे द्यावी लागतात.
प्रश्न: तुमच्या यशात कुटुंबाचे कसे पाठबळ मिळाले?
उत्तर: तुम्ही जे काही करता, त्यात कुटुंबाचे योगदान, पाठिंबा मोठा आहे. माझ्या यशामध्ये माझ्या कुटुंबाचे योगदान महत्त्वाचे आहे. प्रेरणा, प्रोत्साहन गरजेचे असते. ते कुटुंबीयांकडून मला मिळाले. ध्येय, स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रचंड मेहनतही महत्त्वाची असते.
अकोला: बालक दिनानिमित्त मंगळवारी निवडक विद्यार्थ्यांनी पत्रकार म्हणून जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांची दोन तास प्रदीर्घ मुलाखत घेतली. जिल्हाधिकाºयांनीही विद्यार्थ्यांचे स्वागत करीत, त्यांनी जीवनाचा सक्सेस पासवर्ड सांगितला. जीवनात मोठे होण्यासाठी मोठी स्वप्ने बघा आणि ही स्वप्ने पूर्ण करण्यासाठी ध्येय ठेवा, आत्मविश्वास आणि जिद्दीने पुढे जा, असा मंत्र दिला. बालशिवाजी शाळेच्या शैलजा लोहिया, आस्था अग्रवाल, आदित्य चतरकर, स्कूल आॅफ स्कॉलर्सची रश्मी सिरसाट, भारत विद्यालयाचे साकार बांदे, तनय गावंडे, डॉ. हेडगेवार माध्यमिक शाळेचा ऋषिकेश इंगळे यांनी अभ्यासपूर्ण इंग्रजी व मराठीतून जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांची मुलाखत घेतली. त्यांनी आयएएस होण्यासाठी केलेला अभ्यास, कुटुंबाचे पाठबळ, मोर्णा नदी स्वच्छता अभियानासोबतच शहराच्या विकासासंबंधी अभ्यासपूर्ण प्रश्न विचारले. विद्यार्थ्यांच्या अभ्यासपूर्ण प्रश्नांनी जिल्हाधिकारीसुद्धा अवाक् झालेत.
प्रश्न: आयएएस अधिकारी होण्यासाठी कशी तयारी केली?
उत्तर: सहावीत असताना, कधी सैन्यात जावे, पायलट व्हावे, असे वाटायचे. अभ्यासात प्रगती चांगली होती. पहिल्या तीनमध्ये स्थान मिळवायचो. दहावीत गेल्यावर सैन्यात जाण्यासाठी तयारी सुरू केली. बारावीनंतर मात्र ‘आयएएस’साठी तयारी सुरू केली. पदवी, पदव्युत्तर शिक्षण कशात करायचे, याची माहिती घेतली. सात वर्षे यूपीएससी परीक्षेचे नियोजन केले. पुस्तके, अभ्यासक्रमाची माहिती घेतली. कोणते प्रश्न विचारले जातील, याचाही अभ्यास केला. आयएएस अधिकारी म्हणून तयारी करताना जात, धर्म, पंथ याचा विचार बाजूला सारावा लागतो. २00१ ते २00८ पर्यंत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला. २00८ मध्ये यूपीएससीची पूर्वपरीक्षा दिली; परंतु त्यात अपयश आले. त्यानंतर कुटुंबातील लग्नकार्य वाढदिवस, एवढेच नाही, तर दु:खद घटनांच्यावेळीसुद्धा घरापासून दूर राहिलो. झारखंड विद्यापीठात अध्यापनाचे काम केले. २00९ मध्ये पुन्हा प्रयत्न करून यश मिळविले. सीपीएसमध्ये निवड झाली. एसीपी म्हणून निवड झाल्यावर प्रशिक्षण घेतले. २0११ मध्ये आयएएस फायनलचा निकाल आला आणि त्यात निवड झाली.
प्रश्न: एक अधिकारी म्हणून कोणत्या विचारधारेने काम करता?
उत्तर: अधिकारी म्हणून काम करताना, विचारधारा नसते. भारताचे संविधान सर्वात मोठे. संविधानाला अनुसरून काम करतो. कोणत्याही एका विचारधारेने प्रभावित होऊन काम करीत नाही. जेही करायचे, ते मनापासून करायचे. सर्वांचे हित लक्षात घेऊन काम करायचे. चुकलो तर आत्मपरीक्षण करून दुरुस्ती करण्याचा प्रयत्न करतो. सर्वच प्रकारची पुस्तके वाचनातून व्यक्तिमत्त्व घडते.
प्रश्न: शेतकरी आणि शेतीच्या प्रश्नांविषयी तुमचे मत काय?
उत्तर- माझे वडील शेतकरी आहेत. ते शेती करायचे. त्यामुळे मलाही शेतीची आवड आहे. आपला देश कृषिप्रधान आहे. त्यामुळे एक अधिकारी म्हणून शेती आणि शेतकºयांच्या समस्यांची जाण असणे गरजेचे आहे. निवासस्थानाच्या जागेवर मीसुद्धा शेती करून सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला पिकविला.
प्रश्न: मोर्णा नदी स्वच्छता अभियानाची कल्पना कशी सुचली?
उत्तर- अनेक शहरं ही नदी काठावर वसली आहेत. नद्या या जीवनदायिनी आहेत. सद्यस्थितीत नद्यांचे पाणी प्रदूषित होत आहे. नद्यांचे पाणी आटत आहे. येथे आल्यावर मोर्णा ही नदी आहे की नाला, हे समजले नाही. मोर्णा नदी ही शहराची जीवनदायिनी आहे, तिची स्वच्छता करून तिचे सौंदर्यीकरण करण्याच्या उद्देशाने स्वच्छता अभियान सुरू केले आणि अकोलेकरांनी त्याला पाठबळ दिले.
प्रश्न: रस्त्यांचे बांधकाम निकृष्ट होते, रस्त्यांवर खड्डे पडतात, यावर काय कारवाई करणार?
उत्तर: निकृष्ट रस्ते, खड्डे, बोगस बांधकाम यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि कंत्राटदार जबाबदार आहेत. बांधकाम विभागाच्या कार्यपद्धतीचे हे अपयश आहे. निकृष्ट रस्ते बांधकामामध्ये दोषी अधिकारी, कंत्राटदारांना शिक्षा करून त्यांच्याकडून निधीची वसुली करू.
प्रश्न: शहर विकासाविषयी तुम्ही केलेल्या नियोजनाविषयी सांगा?
उत्तर- शहर विकासाला गती मिळत आहे. येथे विकासाला भरपूर वाव आहे. त्या दृष्टिकोनातून नियोजन केले आहे. विकासाचा अनुशेष भरून काढायचा आहे. दर्जेदार रस्ते, एलईडी लाइट्स, सौंदर्यीकरणाविषयी नियोजन तयार आहे. शहरात विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. शैक्षणिकदृष्ट्या अकोला शहर प्रगतिपथावर आहे. त्या दृष्टिकोनातून सार्वजनिक स्थळांचा विकास करायचा आहे. मनपाला तीन जागा मॉल, कमर्शिअल कॉम्प्लेक्ससाठी द्यायचे ठरले आहे. अकोल्याच्या अर्थव्यवस्थेला चालना देऊन चांगल्या सुविधा उपलब्ध करून द्यायच्या आहेत.
प्रश्न: सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी तुमची भूमिका काय?
उत्तर: सौर ऊर्जा प्रकल्पासाठी केंद्र शासनसुद्धा आग्रही आहे. विजेची कमतरता लक्षात घेता, जिल्ह्यात आठ सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. तालुका स्तरावर हे प्रकल्प उभारण्यासाठी काम सुरू आहे.