जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यार्थिनीला घेतले दत्तक
By admin | Published: April 12, 2017 09:35 PM2017-04-12T21:35:35+5:302017-04-12T21:35:35+5:30
अकोला- म्हैसपूर येथे पार पडलेल्या एका कार्यक्रमात, हगणदरी मुक्तीवर नाट्य सादर करणाऱ्या चिमुरडीच्या कलेने प्रभावित होऊन जिल्हाधिकाऱ्यांनी तिला दत्तक घेतले.
शिक्षणाचा खर्चही उचलणार: घरी भेट देऊन जाणून घेतली परिस्थिती
अकोला : अकोल्याचे जिल्हाधिकारी जी.श्रीकांत संवेदनशील असल्याचे प्रत्यंतर म्हैसपूर येथे पार पडलेल्या एका कार्यक्रमात आले. कार्यक्रमात हगणदरी मुक्तीवर नाट्य सादर करणाऱ्या चिमुरडीच्या कलेने प्रभावित होऊन जिल्हाधिकाऱ्यांनी तिच्या घरची परिस्थिती समजल्यानंतर तिला दत्तक घेतले. तिच्या शिक्षणाच्या, भविष्यात लग्नाचा खर्चही जिल्हाधिकारी जी.श्रीकांत करणार आहेत.
अकोला शहरापासून जवळच असलेल्या म्हैसपूर येथील जिल्हा परिषदेची शाळा डिजिटल करण्यात आली आहे. यानिमित्ताने गेल्या आठवड्यात म्हैसपूर येथे ग्रामस्थांच्या मदतीने आयोजित समारंभात जिल्हाधिकाऱ्यांनी हजेरी लावली. या कार्यक्रमात जि.प.शाळेत शिकणाऱ्या चवथ्या वर्गातील उन्नती दिलीप इंगळे या चिमुरडीने हगणदरीमुक्तीवर नाटिका सादर केली. सावित्रीबार्इंच्या वेशातील तिचा तो अवतार पाहून जिल्हाधिकारी प्रभावित झाले. कार्यक्रमात त्यांनी सत्कारात मिळालेली शाल आणि पुष्पगुच्छ उन्नतीला देऊन तिचा गौरव केला. एवढ्या छोट्याशा गावात जि.प.शाळेत शिकणारी मुले अशी चुणूक दाखवू शकतात, याचे कौतुक करून जिल्हाधिकाऱ्यांनी उन्नतीची आस्थेने चौकशी केली. तिला जवळ घेत संवाद साधल्यानंतर तिच्या घरीच शौचालय नसल्याचे त्यांना समजले. शौचालय नाही म्हणजेच उन्नतीची घरची परिस्थिती जेमतेम असेल, हे त्यांनी हेरले. त्यानंतर त्यांनी उन्नतीचे घर गाठले व तिच्या कुटुंबियांची चौकशी केली. मोलमजुरी करून पोट भरणाऱ्या या गरिबांच्या झोपडीला जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिल्यामुळे इंगळे कुटुंबियांचा आनंद गगणात मावेना. जिल्हाधिकाऱ्यांनी एकूण परिस्थिती पाहून उन्नतीच्या शिक्षणाचा पूर्ण खर्च करण्याची तयारी दर्शवून तिला दत्तक घेत असल्याचे जाहीर केले.
उन्नतीच्या घरी पोहोचले ‘रेडिमेड टॉयलेट’
जिल्हाधिकाऱ्यांनी उन्नतीला दत्तक घेतल्यानंतर तिच्या घरी रेडिमेड शौचालय उभारण्याची जबाबदारी ‘भारत एक कदम’ या संस्थेने स्वीकारली. संचालक अरविंद देठे यांनी गत आठवड्यात कोणतेही शुल्क न घेता उन्नतीच्या घरी रेडिमेड शौचालय उभारून दिले. जिल्हाधिकाऱ्यांसोबतच ‘भारत एक कदम’ या संस्थेच्या सामाजिक बांधीलकीचे ग्रामस्थांनी कौतुक केले.