जिल्हाधिका-यांनी घेतला पालकांचा वर्ग!
By admin | Published: November 27, 2015 01:51 AM2015-11-27T01:51:19+5:302015-11-27T01:51:19+5:30
पालकांची कानउघडणी : अल्पवयीन मुलांच्या हाती गाडी न देण्याची तंबी.
अकोला: मुलांच्या हट्टीपणामुळे अल्पवयातच त्यांच्या हाती दुचाकी सोपविणार्या पालकांची जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी गुरुवारी माउंट कारमेलमध्ये ह्यशाळाह्ण घेतली. इयत्ता नववी, दहावीतील विद्यार्थ्यांंच्या हाती दुचाकी देण्यामागची कारणे त्यांनी जाणून घेतली असता, पालकांनी त्यांच्याकडे माफी मागत पुन्हा अशी चूक करणार नसल्याचे वचन दिले. गत आठवड्यात शहरातील मालधक्का परिसरातील अपघातात एका युवतीचा मृत्यू झाला. यानंतर जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी शालेय विद्यार्थ्यांंंच्या हाती दुचाकी देऊ नका, या संदर्भातील सर्व शाळेच्या मुख्याध्यापकांना सूचना केली. त्यांच्या या सूचनेनंतरही विद्यार्थी मोठय़ा संख्येने दुचाकी शाळेत घेऊन येत असल्याचे निदर्शनास आले. त्या अनुषंगाने जिल्हाधिकार्यांनी गुरुवार, २६ नोव्हेंबर रोजी माउंट कारमेल शाळेतील दुचाकीधारक विद्यार्थ्यांंंच्या पालकांना माउंट कारमेलच्या सभागृहात बोलावून त्यांची कानउघाडणी केली. यावेळी जिल्हाधिकार्यांनी सर्वप्रथम दुचाकीधारक विद्यार्थ्यांंंच्या पालकांना एका रांगेत उभे करून, अल्पवयीन विद्यार्थ्यांंंच्या हाती दुचाकी देण्यामागची कारणे जाणून घेतली. पालकांनी दिलेली विविध कारणे ऐकून घेतल्यानंतर जिल्हाधिकार्यांनी शहरात घडलेल्या काही अपघातांची उदाहरणे देत पालकांना सतर्क केले.