तेल्हारा तालुक्यातील विविध समस्या मार्गी लावण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:43 AM2020-12-17T04:43:54+5:302020-12-17T04:43:54+5:30
तेल्हारा : तालुक्यातील विविध समस्या मार्गी लावण्यासाठी युवाशक्ती संघटनेतर्फे ४ डिसेंबर रोजी आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाला ...
तेल्हारा : तालुक्यातील विविध समस्या मार्गी लावण्यासाठी युवाशक्ती संघटनेतर्फे ४ डिसेंबर रोजी आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाला उपजिल्हाधिकारी सुरंजे यांनी भेट देऊन समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर युवाशक्ती संघटनेच्या शिष्टमंडळाची ११ डिसेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात बैठक झाली. यामध्ये तालुक्यातील विविध समस्या मार्गी लावण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी संबंधित विभागांना दिले.
तेल्हारा तालुक्यातील खड्डेमय रस्त्याची दुरुस्ती करावी, दुष्काळी निधीचा त्वरित लाभ द्यावा, पीकविमा मिळण्यासाठी सुधारित आणेवारी काढण्यात यावी, शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीजपुरवठा द्यावा यासह विविध मागण्यांसाठी युवाशक्ती संघटनेचे शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली व तालुक्यातील समस्यांचा पाढा वाचला. त्यावर जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचा तेल्हारा तालुक्यातील सर्व रस्त्याबाबतचा आढावा घेतला असता हिवरखेड-तेल्हारा रस्ता सुरू नसल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यांना पंधरा दिवसात त्वरित रस्ते निर्माणाच्या कामाला लागण्याचे मुख्य कार्यकारी अभियंत्यास निर्देश दिले. तसेच तालुक्यातील ६२ पैसे आणेवारीबाबत तपासणी केल्यानंतर अंतिम आणेवारी ३१ डिसेंबरला काढण्यात येईल, असे युवाशक्ती संघटनेकडून सांगण्यात आले. युवाशक्ती संघटनेच्या शिष्टमंडळात भवानी प्रताप, दयाल बलोदे, केशव ताथोड, सत्यशील सावरकर, उत्तम नळकांडे, योगेश विचे, हरिदास वाघ, विजय बोर्डे, धीरज बकाल, अमित काकड, अनिकेत बकाल यांचा सहभाग होता.