तेल्हारा ग्रामसेवकांनी केली जिल्हा परिषद ‘सीईओं’ च्या आदेशाची होळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2019 02:04 PM2019-09-09T14:04:58+5:302019-09-09T14:05:04+5:30
ग्रामसेवक संघटनेने सोमवारी तेल्हारा पंचायत समितीसमोर होळी करून निषेध व्यक्त केला.
तेल्हारा: विविध मागण्यांसाठी असहकार व कामबंद आंदोलन करीत असलेल्या ग्रामसेवकांना कार्यमुक्त करण्याच्या जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी आयुषप्रसाद यांच्या आदेशाच्या प्रतींची ग्रामसेवक संघटनेने सोमवारी तेल्हारा पंचायत समितीसमोर होळी करून निषेध व्यक्त केला.
राज्यातील सर्व ग्रामसेवकांचे ९ आॅगस्टपासून असहकार आंदोलन व २२ आॅगष्ट पासुन काम बंद आंदोलन सुरु आहे. राज्य शासनासोबत आंदोलनातील मागण्याबाबत चर्चा सुरु असताना अकोला जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषप्रसाद यांनी न आंदोलन काळात ग्रामसेवक संवर्ग वर दबाव आणण्यासाठी त्यांनाकार्यमुक्त करणे,इतर विभागातील कर्मचारी यांना पदभार देणे व त्यावेळी अभिलेखे तपासणे, अनियमितता आढळल्यास फौजदारी गुन्हे दाखल करणे, ग्रामपंचायत ची खाते तपासणी करणे,अशा स्वरुपात लेखी आदेश दिले आहेत. हे आदेश म्हणजे एक प्रकारची दडपशाही व अधिकाराचा गैरवापर असल्याचा आरोप करीत ग्रामसेवक संघटनेने तीव्र निषेध व्यक्त केला. तसेच या आदेशाच्या प्रतींची पंचायत समिती तेल्हारा समोर होळी करण्यात आली. त्यावेळी तेल्हारा ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष इंगळे, खुमकर तसेच संघटनेचे सर्व पदाधिकारी उंबरकार, कोळसकर, खंडेराव, चीमोटे, देशमुख, मेतकर, चव्हाण, शेळके, थिटे, देशमुख, करवते, फाळके, ठाकूर, पाकधूने, वाडेकर, वानखेडे, टीकार, राऊत, माहुलकर व इतर उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)