जिल्हा परिषद निवडणूक; प्रचारतोफा आज थंडावणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2020 12:20 PM2020-01-05T12:20:46+5:302020-01-05T12:21:49+5:30
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणूक रिंगणातील उमेदवारांच्या गत सहा दिवसांपासून धडाडणाऱ्या प्रचारतोफा रविवारी रात्री थंडावणार आहेत.
अकोला : जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी ७ जानेवारी रोजी मतदान घेण्यात येणार असून, निवडणूक प्रचाराची मुदत रविवार, ५ जानेवारी रोजी रात्री १० वाजता संपणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणूक रिंगणातील उमेदवारांच्या गत सहा दिवसांपासून धडाडणाऱ्या प्रचारतोफा रविवारी रात्री थंडावणार आहेत.
जिल्हा परिषदेचे ५३ गट आणि जिल्ह्यातील अकोला, अकोट, तेल्हारा, बाळापूर, बार्शीटाकळी, पातूर व मूर्तिजापूर या सात पंचायत समित्यांच्या १०६ गणांच्या निवडणुकीसाठी मंगळवार, ७ जानेवारी रोजी मतदान घेण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या ५३ गटांमध्ये २७७ आणि सात पंचायत समित्यांच्या १०६ गणांमध्ये ४९२ असे एकूण ७६९ उमेदवार निवडणूक लढवित आहेत. त्यामध्ये विविध राजकीय पक्ष आणि अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. निवडणूक लढविणाºया उमेदवारांचा प्रचार गत ३१ डिसेंबरपासून सुरू झाला असून, निवडणूक प्रचाराची मुदत रविवार, ५ जानेवारी रात्री १० वाजता संपणार आहे.
त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीत निवडणूक लढविणाºया उमेदवारांच्या प्रचारतोफा ५ जानेवारी रोजी रात्री १० वाजता थंडावणार आहेत. त्यानुषंगाने जिल्ह्यातील ग्रामीण भागात जिल्हा परिषदेचे ५३ गट आणि पंचायत समित्यांच्या १०६ गण अंतर्गत गावा-गावांमध्ये गत सहा दिवसांपासून सुरू असलेला उमेदवारांचा जाहीर निवडणूक प्रचार थांबणार आहे.
मतदान पथके सोमवारी होणार रवाना!
जिल्हा परिषद व जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील १ हजार १७ मतदान केंद्रांवर ७ जानेवारी रोजी मतदान घेण्यात येणार आहे. त्यासाठी नियुक्त करण्यात आलेले मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांची पथके सोमवार, ६ जानेवारी रोजी नेमून दिलेल्या मतदान केंद्रांवर रवाना होणार आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रियेची तयारी जिल्हा प्रशासनामार्फत पूर्ण करण्यात आली आहे.