जिल्ह्याची वाटचाल हिवताप निर्मूलनाकडे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:18 AM2021-04-25T04:18:34+5:302021-04-25T04:18:34+5:30
हिवतापाची लक्षणे थंडी वाजून ताप येणे, ताप हा सततचा असू शकतो किंवा एक दिवस आड येऊ शकतो. नंतर घाम ...
हिवतापाची लक्षणे
थंडी वाजून ताप येणे, ताप हा सततचा असू शकतो किंवा एक दिवस आड येऊ शकतो. नंतर घाम येऊन अंग गार पडते, डोके दुखते, बऱ्याच वेळा उलट्या होतात, हातपाय दुखणे यासारखी लक्षणे दिसल्यास सर्व सरकारी रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, नागरी आरोग्य केंद्र व प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच हिवताप कार्यालयात जाऊन तेथील प्रयोगशाळेत रुग्णाचा रक्त नमुना तपासून घ्यावा. रक्त नमुना दूषित आढळून आल्यास समूळ उपचार मोफत करण्यात येतो.
हिवताप आजारावर उपाययोजना
आपल्या घराभोवती अथवा परिसरात पाणी साचू न देणे, साचलेली डबकी वाहती करणे किवा बुजवणे, घराच्या खिडक्यांना डासविरोधी जाळ्या बसविणे, छतावरील पाण्याच्या टाक्यांना घट्ट झाकण लावणे, पाण्याची भांडी झाकून ठेवणे, घरगुती पाण्याचे साठे आठवड्यातून किमान एकदा रिकामे करून घासुन, पुसून, स्वच्छ करून कोरडा दिवस पाळणे, टायर, फुटके कॅन, डबे यांची योग्य रीतीने विल्हेवाट लावून त्यात पाणी साठणार नाही याची काळजी घेणे. झोपताना मच्छरदाणीचा वापर करणे, पूर्ण बाह्यांचे कपडे घालणे, संडासच्या व्हेंट पाइपला जाळी बसविणे, कायमस्वरूपी डासोत्पत्ती स्थानांमध्ये गप्पीमासे सोडणे. तसेच आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळणे.
जिल्ह्यातील रुग्णांची स्थिती
वर्ष - रक्त नमुने- हिवताप दूषित रुग्ण
२०१६ - ३५१४९८ - ९२
२०१७ - ३२४६८४ - ५३
२०१८ - ३३६५३८ - ३६
२०१९ - ३४४६६० - ११
२०२० - २७०४३८ - ०९
२०२१ - ५७९२२ - ०१
जिल्ह्यात हिवताप रुग्णांमध्ये लक्षणीय घट झाली असून हिवतापाचा एकही मृत्यू झालेला नाही. २०२२ पर्यंत जिल्हा हिवताप निर्मूलनाचे लक्ष्य गाठण्याचे उद्दिष्ट असून त्या दिशेने वाटचाल सुरू आहे.
- डॉ. कमलेश भंडारी, सहायक संचालक, आरोग्य सेवा, हिवताप, अकोला