काेराेना लसीकरणासाठी जिल्हास्तरावर नियाेजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 04:14 AM2020-12-09T04:14:29+5:302020-12-09T04:14:29+5:30
अकोला: कोविड-१९ च्या संसर्गाविरुद्ध उपाययोजनेचा भाग म्हणून संभाव्य लसीकरण कार्यक्रमाचे नियोजन हे शासनाच्या आरोग्य विभागाने दिलेल्या मार्गदर्शक सूचना ...
अकोला: कोविड-१९ च्या संसर्गाविरुद्ध उपाययोजनेचा भाग म्हणून संभाव्य लसीकरण कार्यक्रमाचे नियोजन हे शासनाच्या आरोग्य विभागाने दिलेल्या मार्गदर्शक सूचना व जागतिक आरोग्य संघटनेने ठरवून दिलेल्या मानकाप्रमाणे करावे. हे नियोजन परिपूर्ण असावे त्यासाठी कोविड लसीकरण संनियंत्रण समितीच्या सर्व घटकांनी आपले योगदान द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले.
शासनाच्या निर्देशानुसार कोविड-१९ चे लसीकरण राबविण्यासंदर्भात आज जिल्हा कृती दलाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या समवेत मनपा आयुक्त संजय कापडणीस, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, मनपाचे आरोग्य अधिकारी फारुख शेख, सहायक आयुक्त समाज कल्याण यू.एस. वाल, जिल्हा परिषद समाजकल्याण अधिकारी एम.डी. खानडे, मनपा शिक्षणाधिकारी डॉ. शाहिन सुलताना, सुधीर माळवे, डॉ. शफीक अहमद तसेच आयएमएचे व्ही. एन. राजगुरू, अमोल खेळकर, रोटरी क्लबचे यू.पी. वझे, लॉयन क्लबचे संदीप चव्हाण, जिल्हा क्रीडा अधिकारी महेश पवार, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. मनीष शर्मा, डॉ. एस.आर. ठोसर आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सांगितले की, गेले अनेक महिने आपण सर्व यंत्रणा कोविडविरुद्ध लढा देत आहोत. त्याच जिद्दीने आणि संघटित प्रयत्नाने यापुढेही काम करावयाचे आहे. त्यासाठी सर्व पातळीवरील लसीकरणाचे नियोजन करावे. महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा आरोग्य यंत्रणा, पोलीस दल, गृह रक्षक दल, विविध सामाजिक वैद्यकीय क्षेत्रातील काम करणाऱ्या संस्था व संघटना यांनी या कामी योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. मनीष शर्मा यांनी उपस्थितांचे आभार मानले.
बाॅक्स
पहिल्या टप्यात आराेग्य कर्मचाऱ्यांना लस
शासन निर्धारित करेल त्यानुसार लसीकरण कार्यक्रम राबविण्यात येईल. त्यासाठी पूर्वतयारीचा भाग म्हणून लाभार्थी निश्चितीकरण, लसीकरण कक्ष निर्मिती, लसीची शीतसाखळी जोपासणे, लसीकरण कार्यक्रमातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षणाचे आयाेजन केले आहे. लसीकरणाच्या पहिल्या टप्यात सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण होईल. संदर्भातील संनियंत्रणासाठी राज्य, जिल्हा व तालुका पातळीवर समित्या गठित करण्यात येणार आहेत, संभाव्य लसीकरण कार्यक्रमासाठी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने सॉफ्टवेअर तयार केले असून, त्याव्दारे लसीकरणाची सर्व माहिती व नियोजन तयार केले जाणार आहे.