कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांसाठी जिल्हास्तरीय ‘टास्क फोर्स’ गठित!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:19 AM2021-05-19T04:19:17+5:302021-05-19T04:19:17+5:30
अकोला: कोरोना महामारीमुळे पालक गमावलेल्या बालकांचे पुनर्वसन करण्यासाठी जिल्हास्तरीय कृती दल (टास्क फोर्स) गठित करण्यात आले असून, कोरोनामुळे दोन्ही ...
अकोला: कोरोना महामारीमुळे पालक गमावलेल्या बालकांचे पुनर्वसन करण्यासाठी जिल्हास्तरीय कृती दल (टास्क फोर्स) गठित करण्यात आले असून, कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांच्या पुनर्वसनासाठी संबंधित बालकांचा शोध घेऊन जिल्हा बाल कल्याण समिती किंवा संबंधित तहसीलदार, गटविकास अधिकारी व बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडे माहिती देण्याचे आवाहन अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांनी मंगळवारी केले.
अपर जिल्हाधिकारी यांच्या दालनात बालकांच्या काळजी व संरक्षणाकरिता कृती दलाची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विलास मरसाळे, बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष पल्लवी कुळकर्णी, मनपाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.अस्मिता पाठक, जिल्हा विधिसेवा प्राधिकरण सदस्य सचिव राजेश देशमुख, चाइल्ड लाइन समन्वयक हर्षाली गजभिये, जिल्हा आरोग्य विभागाचे डॉ.सुनील मानकर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजू लाडुलकर, संगीता ठाकूर, सुनील सरकटे आदी उपस्थित होते.
सद्यस्थितीत कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग आणि कोरोनबाधित रुग्णांच्या मृत्यूचे वाढते प्रमाण विचारात घेता, त्याचा बालकांच्या जीवनावर परिणाम होत आहे. त्यात काही बालकांनी दोन्ही पालक गमावले आहेत. या बालकांची काळजी घेणारे कोणीही नसल्याने ही बालके शोषणास बळी पडण्याची शक्यता असते, तसेच बालकामगार किंवा मुलांची तस्करी सारख्या गुन्ह्यांना बळी पडण्याची शक्यता असते. बालकांचे शोषण होऊ नये, यासाठी त्यांचे संरक्षण व पालनपोषण व्हावे, याकरिता अधिनियमान्वये जिल्हास्तरीय कृती दल ९ मे रोजी गठीत करण्यात आले आहे. या कृती दलामार्फत पालक गमावलेल्या बालकांचे पालनपोषण व संरक्षण करण्यात येणार आहे.
आई किंवा वडील, तसेच दोघांचाही कोरोनामुळे मृत्यू झाला असल्यास किंवा कोरोनाची लागण झाली असल्यास, अशा १८ वर्षांखालील बालकांचे तात्पुरत्या व दीर्घकाळ स्वरूपात पुनर्वसन करण्यात येणार आहे. बाल कल्याण समितीमार्फत अशा बालकांचे बालगृहांमध्ये पुनर्वसन करण्यात येणार असून, जिल्हा व तालुकास्तरावर अशी बालके आढळून आल्यास तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी, अंगणवाडीसेविका, ग्रामसेवक, सरपंच, पोलीस पाटील यांचेशी संपर्क साधावा किंवा बालकांचे हितचिंतक या नात्याने चाइल्ड हेल्पलाइन १०९८ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला बालविकास अधिकारी विलास मरसाळे यांनी केले.