कर्ज प्रकरण मंजुरीसाठी लाच मागणारा जिल्हा व्यवस्थापक गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2019 09:25 AM2019-08-22T09:25:05+5:302019-08-22T09:25:13+5:30
मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास मंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकासह रोजंदारी कर्मचाºयास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २१ आॅगस्ट रोजी अटक केली.
अकोला : पातुरातील विद्यार्थ्याला शैक्षणिक कर्ज प्रकरण मंजुरीला पाठविण्यासाठी लाच मागणाऱ्या मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास मंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकासह रोजंदारी कर्मचाºयास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २१ आॅगस्ट रोजी अटक केली. त्यांच्याकडून चार हजार रुपयेही जप्त करण्यात आले.
पातूर शहरातील एका १९ वर्षीय विद्यार्थ्याने मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास मंडळाच्या अकोला कार्यालयात शैक्षणिक कर्जासाठी अर्ज केला होता. हे कर्ज प्रकरण मंजुरीला पाठविण्यासाठी मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास मंडळाचे जिल्हा व्यवस्थापक संजय बळीराम पहुरकर यांनी विद्यार्थ्यास ७ हजार रुपयांची लाच मागितली. विद्यार्थ्यास लाच द्यायची नसल्याने त्याने याविषयी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून चार हजार रुपये घेताना जिल्हा व्यवस्थापक पहुरकर व रोजंदारी कर्मचारी शेख सादिक शेख गुलाम यांना बुधवारी अटक केली. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक ईश्वर विजय चव्हाण, पो.हवा,गजानन दामोदर, अन्वर खान यांनी केली. दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.