‘अनलॉक-४’ च्या प्रक्रियेकडे जिल्हावासीयांचे लक्ष!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2020 10:47 AM2020-08-31T10:47:27+5:302020-08-31T10:48:28+5:30
‘अनलॉक-४’च्या टप्प्यात जिल्ह्यात नेमके काय खुले राहणार आणि कशावर निर्बंध कायम राहणार, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागून आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : ‘मिशन बिगीन अगेन’अंतर्गत राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरू आहे. मार्च महिन्यापासून लावण्यात आलेले लॉकडाऊन आतापर्यंत तीन वेळा काही प्रमाणात शिथिल करण्यात आले होते व आता अनलॉक चवथ्या टप्प्याची प्रक्रिया प्रशासकीय पातळीवर सुरू झाली आहे. त्यामुळे १ सप्टेंबरपासून ‘अनलॉक-४’च्या टप्प्यात जिल्ह्यात नेमके काय खुले राहणार आणि कशावर निर्बंध कायम राहणार, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागून आहे. ‘अनलॉक-४’ संदर्भात केंद्र शासनाच्या सूचना प्राप्त झाल्या असून, अद्याप राज्य शासनाच्या सूचना प्राप्त झाल्या नाहीत, असे जिल्हा प्रशासनाने रविवारी सायंकाळी स्पष्ट केले.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी ३१ आॅगस्टपर्यंत दिलेल्या आदेशानुसार रविवारचे लॉकडाऊन कायम असून, १ सप्टेंबरनंतर आता रविवारचेही लॉकडाऊन संपण्याचे संकेत अॅनलॉक-४ मध्ये आहेत.
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात २४ मार्चपासून लॉकडाऊन आहे. लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेला जबर फटका बसल्याने लॉकडाऊनमध्ये हळूहळू शिथिलता आणली जात आहे. जिल्ह्यात सध्या ३१ आॅगस्टपर्यंत लॉकडाऊन असून, सर्व दुकाने, आस्थापना हे सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंतच्या कालावधीत सुरू ठेवण्यास मुभा आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे, दुसरीकडे लॉकडाऊनमुळे अर्थचक्रही प्रभावित होत आहे.
त्यामुळे १ सप्टेंबरपासून दुकाने सुरू ठेवण्याच्या वेळेत वाढ होण्याचे संकेत आहे. ‘अनलॉक-४’ संदर्भात केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाल्या आहेत; परंतु अद्याप राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्या नाहीत. राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्ह्यात ‘अनलॉक-४’च्या टप्प्याची अंमलबजावणी होणार असल्याने तूर्तास जिल्हा प्रशासनासह नागरिकांना राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांची प्रतीक्षा आहे.
३१ आॅगस्टपर्यंत यावर आहेत निर्बंध
सर्व शाळा, कॉलेज, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था, कोचिंग क्लासेस इत्यादी ३१ आॅगस्टपर्यंत बंद आहेत. हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि इतर आतिथ्य सेवा, सिनेमागृह, जिम्नॅशियम, जलतरण तलावदेखील बंदच आहेत.
सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम व सर्व प्रकारच्या मेळाव्यांवर बंदी आहे.
सर्व धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे सामान्य व्यक्तींसाठी बंद असून, कोणत्याही परिस्थितीत धार्मिक सभा, धार्मिक परिषद, धार्मिक मेळावे ३१ आॅगस्टपर्यंत घेता येणार नाहीत.