पुरवठा विभागाच्या दिरंगाईचा शिधापत्रिकाधारकांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 03:35 PM2018-09-19T15:35:44+5:302018-09-19T15:35:51+5:30
जिल्ह्यात ४ हजार ४१८ शिधापत्रिकाधाका अद्याप आधार क्रमांकाशी ‘लिंक’ करण्यात आल्या नसल्याने, संबंधित शिधापत्रिकाधारकांना रास्त भावाच्या धान्यापासून वंचित राहावे लागत आहे.
- संतोष येलकर
अकोला: सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत शिधापत्रिका आधार क्रमांकाशी संलग्नित (लिंक) असलेल्या शिधापत्रिकाधारकांना ‘ई-पॉस’ मशीनद्वारे धान्य वाटप करण्यात येत आहे; मात्र जिल्ह्यात ४ हजार ४१८ शिधापत्रिकाधाका अद्याप आधार क्रमांकाशी ‘लिंक’ करण्यात आल्या नसल्याने, संबंधित शिधापत्रिकाधारकांना रास्त भावाच्या धान्यापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे शिधापत्रिका आधार लिंक करण्याच्या कामातील जिल्हा पुरवठा विभागाच्या दिरंगाईचा फटका गरीब शिधापत्रिकाधारक लाभार्थींना सहन करावा लागत आहे.
शासन निर्णयानुसार सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत पुरवठा विभागामार्फत जिल्ह्यात शिधापत्रिका आधार क्रमांकाशी लिंक करण्यात आलेल्या शिधापत्रिकाधारकांना दरमहा रास्त भाव दुकानांमधून‘ई-पॉस’ मशीनद्वारे धान्य वाटप करण्यात येत आहे. त्यासाठी गत दोन वर्षांपासून जिल्ह्यातील शिधापत्रिका संबंधित शिधापत्रिकाधारकांच्या आधार क्रमांकासोबत संलग्नित करण्याचे काम जिल्हा पुरवठा विभागामार्फत सुरू करण्यात आले आहे; परंतु अद्याप शिधापत्रिका आधार क्रमांकासोबत ‘लिंक’ करण्याचे काम पूर्ण करण्यात आले नाही. जिल्ह्यात एकूण ४ लाख ८६६ शिधापत्रिकाधारक असून, त्यापैकी २ लाख ७७ हजार ९६५ शिधापत्रिकाधारक धान्य वाटपास पात्र आहेत. त्यामध्ये बीपीएल, केशरी शिधापत्रिकाधारक एपीएल शेतकरी शिधापत्रिकाधारक व अंत्योदय योजनेतील शिधापत्रिकाधारकांचा समावेश आहे. दरमहा धान्य वाटपासाठी पात्र शिधापत्रिकाधारकांपैकी २ लाख ७३ हजार ५४७ शिधापत्रिका आधा क्रमांकाशी ‘लिंक ’ करण्यात आल्या असल्या तरी, उर्वरित ४ हजार ४१८ शिधापत्रिका आधार क्रमांकाशी लिंक करण्याचे करण्याचे काम अद्याप बाकी आहे. शिधापत्रिका आधार क्रमांकासोबत लिंक नसलेल्या गरीब शिधापत्रिकाधारकांना रास्त भाव दुकानांमधून मिळणाऱ्या धान्याच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे शिधापत्रिका आधार क्रमांकाशी ‘लिंक’ करण्याच्या कामात जिल्हा पुरवठा विभागाच्या दिरंगाईचा गरीब शिधापत्रिकाधारकांना नाहक फटका सहन करावा लागत आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील शिधापत्रिका आधार क्रमांकाशी ‘लिंक’ करण्याचे काम केव्हा पूर्ण होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.