जिल्हा स्त्री रुग्णालयाचा पाणी पुरवठा खंडितच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2020 05:28 PM2020-03-05T17:28:58+5:302020-03-05T17:29:04+5:30
जिल्हा स्त्री रुग्णालयाकडे गत दोन वर्षांपासून पाणीपट्टीचे १कोटी ९लाख ८५ हजार रुपयांचे देयक थकीत आहेत.
अकोला : पाणीपट्टीचे देयक थकीत असल्याने गत १४ दिवसांपासून जिल्हा स्त्री रुग्णालयाचा पाणी पुरवठा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे येथे प्रसूतीची सेवा प्रभावित झाली आहे. रुग्णालय प्रशासनातर्फे मनपाच्या ट्रेझरीमध्ये ५० लाखांचा भरणा केला असून, दोन ते तीन दिवसांत पाणी पुरवठा सुरू होणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.
जिल्हा स्त्री रुग्णालयाकडे गत दोन वर्षांपासून पाणीपट्टीचे १कोटी ९लाख ८५ हजार रुपयांचे देयक थकीत आहेत. देयक न भरल्याने महापालिकेच्या जलप्रदाय विभागाने पाच दिवसांपूर्वीच येथील पाणी पुरवठा खंडित केला होता. त्यामुळे येथील पाण्याची गरज सहा बोअरच्या साहाय्याने भागविण्यात आली; मात्र यातील एक बोअर जळाल्याने येथील पाण्याचे संकट वाढले आहे. मध्यंतरी मार्च २०१९ मध्ये जिल्हा स्त्री रुग्णालय प्रशासनाने महापालिकेला २० लाखांचे देयक अदा केले होते. रिडिंग न घेताच देयक दोन वर्षांच्या थकीत पाणीपट्टी देताना महापालिकेच्या जलप्रदाय विभागातर्फे १ कोटी ९ लाख ८५ हजार रुपयांचे देयक जिल्हा स्त्री रुग्णालय प्रशासनाला देण्यात आले; परंतु रिडिंग न घेताच हे देयक देण्यात आल्याचे रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे आहे.
उन्हाळ्यामुळे समस्यांमध्ये वाढ
उन्हाची तीव्रता वाढल्याने पाण्याची गरज वाढली आहे. अशातच पाणी पुरवठा खंडित करण्यात आल्याने पाण्याची टंचाई जाणवत आहे. दरम्यान, सहा बोअरपैकी एक बोअर बंद पडल्याने पाच बोअरवर पाण्याची गरज भागविण्यात येत आहे. पाण्याची टंचाई असल्याने त्याचा थेट परिणाम प्रसूतीवर होत आहे. तापमान वाढल्याने रुग्णालयात कूलरदेखील लावणे आवश्यक असून, पाण्याअभावी महत्त्वाच्या वॉर्डात कूलर लावणे टाळण्यात येत आहे.
थकीत देयकापोटी मनपाकडे ५० लाखांचा निधी वळता केला आहे. त्यामुळे येत्या दोन ते तीन दिवसांत पाणी पुरवठा सुरळीत होण्याची शक्यता आहे. सध्यातरी बोअरच्या साहाय्याने पाण्याची गरज भागविण्यात येत असली तरी, उन्हाळा पाहता पाण्याची आवश्यकता जास्त आहे. महापालिका प्रशासनासोबत बोलणे सुरू असून, लवकरच हा प्रश्न मार्गी काढू.
- डॉ. आरती कुलवाल, वैद्यकीय अधीक्षिका, जिल्हा स्त्री रुग्णालय, अकोला.