दिवाकर रावते घेणार विदर्भात सेनेचा संघटनात्मक आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 02:04 PM2018-05-23T14:04:53+5:302018-05-23T14:04:53+5:30

अकोला-आगामी निवडणुका शिवसेना स्वबळावर लढणार असून, त्यादृष्टीने विदर्भातील पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे, असा संदेशच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ११ मे रोजी नागपुरात दिला.

Divakar Rawate will take Organizational Review of Vidarbha shivsena | दिवाकर रावते घेणार विदर्भात सेनेचा संघटनात्मक आढावा

दिवाकर रावते घेणार विदर्भात सेनेचा संघटनात्मक आढावा

Next
ठळक मुद्दे शिवसेनेचे संपर्कप्रमुख परिवहन मंत्री दिवाकर रावते विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यातील तयारीचा आढावा घेत मोहिमेची रणनीती आखून देणार आहेत. येत्या यानंतर २६ मे रोजी ते अकोला येथे सकाळी ११ वाजता अकोला जिल्ह्याचा आढावा होईल.. दुपारी २ वाजता तेथेच वाशिम व सायंकाळी ४ वाजता बुलढाणा जिल्ह्याचाही आढावा घेणार आहेत.

-  राजेश शेगोकार 

अकोला-आगामी निवडणुका शिवसेना स्वबळावर लढणार असून, त्यादृष्टीने विदर्भातील पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे, असा संदेशच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ११ मे रोजी नागपुरात दिला. विदर्भातील दहा लोकसभा मतदारसंघांची चाचपणी या निमित्ताने उद्धव ठाकरे यांनी केली. या बैठकीनंतर विदर्भातील शिवसेनेच्या अस्तित्वाची अन् निवडणूक लढविण्याच्या ताकदीची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. त्यामुळेच कार्यकर्त्यांमधील उत्साह कायम ठेवत शिवसेनेचे संपर्कप्रमुख परिवहन मंत्री दिवाकर रावते विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यातील तयारीचा आढावा घेत मोहिमेची रणनीती आखून देणार आहेत. येत्या यानंतर २६ मे रोजी ते अकोला येथे सकाळी ११ वाजता अकोला जिल्ह्याचा आढावा होईल. दुपारी २ वाजता तेथेच वाशिम व सायंकाळी ४ वाजता बुलढाणा जिल्ह्याचाही आढावा घेणार आहेत. या सर्व बैठकांना पक्षाचे विधानसभा संपर्क प्रमुख, सहसंपर्कप्रमुख, जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख यांच्यासह आमदार, माजी आमदार व प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
विदर्भात भाजपाच्या आक्रमक रणनीतीमुळे शिवसेनेची विदर्भातील चढाईची वाट संघर्षाचीच असल्याचे स्पष्ट होत आहे. मुळातच शिवसेनेचा वेगळ्या विदर्भाला असलेला विरोध लक्षात घेऊनही विदर्भात सेनेचे बियाणे रुजले, वाढले! अर्थात त्यामध्ये भाजपाची साथ महत्त्वाची होती, हे नाकारून चालणार नाही. या दोन्ही पक्षांनी एकमेकांना पूरक ठरत, गेली लोकसभा निवडणूक लढवली अन् जिंकली; मात्र विधानसभा निवडणुकीत युतीधर्म संपुष्टात आल्यावर सेनेची विदर्भातील खरी ताकद अधोरेखित झाली. विदर्भातील १० लोकसभा मतदारसंघांपैकी ४ मतदारसंघ जिंकणारी सेना विधानसभेच्या ६२ मतदारसंघांपैकी केवळ चारच जागा जिंकू शकली! या पृष्ठभूमीवर आगामी लोकसभा निवडणुकीत स्वबळाचे गणित मांडणाºया सेनेला सध्या ताब्यात असलेले मतदारसंघ कायम ठेवण्याचीच मोठी कसरत करावी लागणार आहे. यवतमाळ-वाशिममधील अंतर्गत गटबाजी थेट ‘मातोश्री’वर पोहोचली असून, खा. भावना गवळी व महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्या गटबाजीत कार्यकर्ते मनाने दुभंगले आहेत. अमरावतीमध्ये खा. आनंदराव अडसुळांना घेरण्याची जोरदार तयारी विरोधकांसोबतच भाजपानेही केली आहे. बुलडाण्यात खा. प्रतापराव जाधव यांच्या समोर स्वपक्षीयांतील नाराजांसोबतच भाजपाचेच मोठे आव्हान आहे. रामटेकची स्थितीही वेगळी नाही. भाजपाच्या ताब्यात असलेल्या लोकसभा मतदारसंघांमध्ये सेनेचा ‘बोन्साय’ कसा होईल, याचा प्रयत्न भाजपाने जाणीवपूर्वक केला. त्यामुळे त्या सर्वच मतदारसंघांत उमेदवार शोधण्याचे आव्हान सेनेसमोर आहे. नागपुरात गडकरींची भक्कम तटबंदी आहे. वर्ध्यात सेनेने केलेल्या पक्षांतर्गत बदलामध्ये सामाजिक समीकरण सांभाळल्या न गेल्याने धुसफूस वाढली आहे. गडचिरोली मतदारसंघात आरमोरी क्षेत्रामध्ये सेनेची बºयापैकी ताकद होती; मात्र तिथे जिल्हा परिषद निवडणुकांपासून सेनेत दोन स्वतंत्र गट पडले अन् सेनेतून भाजपाकडे ‘आउटगोर्इंग’ सुरू झाले आहे. चंद्रपूरमधील वरोरा विधानसभा मतदारसंघात सेनेचा झेंडा फडकत असला, तरी आक्रमक रणनीती आखून सर्व राजकारण भाजपाकेंद्रित करण्याचा भाजपाने चालविलेला प्रयत्न पाहता चंद्रपूर लोकसभा तर राहू द्या, वरोºयातही सेनेची स्थिती बिकट होईल, अशी चर्चा आहे. अकोल्यात भाजपचे प्रबळ वर्चस्व आहे. येथेही सेनेला उमेदवारांचाच शोध आहे. राहता राहिला भंडारा-गोंदियाचा प्रश्न, तर तेथील पोटनिवडणुकीत सेनेला स्वबळ आजमावण्याची संधी होती; मात्र सेना एक पाऊल मागे आली आहे. हे चित्र पाहता सेनेला विदर्भात मोर्चेबांधणी करण्यासाठी पक्षांतर्गत गटबाजी दूर करून नव्याने बांधणी करावी लागणार आहे. केवळ ‘शिवबंधन’ हाताला बांधले म्हणजे त्या हाती धनुष्य सुरक्षित राहील, या भ्रमात न राहता, निष्ठावंतांची पारख करून त्यांच्या खांद्यावर ‘धनुष्य’ दिले तरच सेनेच्या चढाईला बळ मिळेल!

विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यातील तयारीचा आढावा
संपर्क प्रमुख व परिवहन मंत्री दिवाकर रावते हे २३ मे रोजी (बुधवार) नागपुरात दाखल होतील. येथे ते रवी भवनात सकाळी ११ वाजता गोंदिया- भंडारा व दुपारी २ वाजता नागपूर जिल्ह्याचा आढावा घेतील. २४ मे रोजी सकाळी ११ वाजता चंद्रपूर, दुपारी २ वाजता गडचिरोली जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन माहिती घेतील. यानंतर २५ मे रोजी ते अमरावतीला रवाना होतील. तेथे सकाळी ११ वाजता शासकीय विश्रामगृहात अमरावतीचा, दुपारी २ वाजता वर्धा व सायंकाळी ४ वाजता यवतमाळचा आढावा घेतील.


संघटनात्मक आढावा घेणार!
२६ मे रोजी ते अकोला येथे सकाळी ११ वाजता अकोला जिल्ह्याचा आढावा घेतील. दुपारी २ वाजता तेथेच वाशिम व सायंकाळी ४ वाजता बुलडाणा जिल्ह्याचाही आढावा घेणार आहेत.

Web Title: Divakar Rawate will take Organizational Review of Vidarbha shivsena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.