महावितरणच्या अमरावती परिमंडळाचे विभाजन
By admin | Published: August 18, 2015 01:31 AM2015-08-18T01:31:11+5:302015-08-18T01:31:11+5:30
अमरावती येथे होणार नवे परिमंडळ.
अकोला : महावितरणच्या अमरावती परिमंडळाचे अकोला व अमरावती परिमंडळ असे विभाजन होणार आहे. १९८१ पासून असलेल्या या परिमंडळाचे ४३ वर्षांनंतर विभाजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महावितरणची राज्यात १४ परिमंडळं आहेत. यापैकी नागपूर ग्रामीण व अमरावती परिमंडळाचे विभाजन होणार असून, या विभाजनामुळे राज्यात १६ परिमंडळ होणार आहेत. राज्यात भौगोलिकदृष्ट्या ही दोन परिमंडळ सर्वात मोठी होती. अमरावती परिमंडळात अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशिम, बुलडाणा हे पाच जिल्हे आहेत, तर नागपूर ग्रामीण परिमंडळात नागपूर शहर वगळता नागपूर जिल्हा, चंद्रपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा, गडचिरोली आदी जिल्ह्यांचा समावेश आहे. नागपूर ग्रामीणचे विभाजन करून चंद्रपूर नवीन परिमंडळ तयार करण्यात आले आहे. त्यामध्ये चंद्रपूर व वर्धा जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. राज्यात सर्वात मोठे क्षेत्र असल्यामुळे अमरावती व नागपूर ग्रामीण परिमंडळाचे विभाजन करण्यात आले. अमरावती परिमंडळाचे मुख्य कार्यालय विद्युत भवन अकोला येथील दुर्गा चौकात आहे. आता या परिमंडळाचे अमरावती व अकोला असे विभाजन होणार आहे. अकोला येथील परिमंडळ कार्यालयाकडे अकोला, वाशिम व बुलडाणा या तीन जिल्ह्यांचा कारभार राहणार असून, अमरावती परिमंडळातून अमरावती व यवतमाळ या जिल्ह्यांचा कारभार सांभाळला जाणार आहे. १९८१ साली अकोला परिमंडळ सुरू झाले होते. त्यानंतर २00५ मध्ये विद्युत मंडळाचे महावितरण, महानिर्मिती व महापारेषण असे विभाजन झाले. त्यानंतरही पाच जिल्ह्यांचे कामकाज अकोला येथील विद्युत भवनातून सांभाळले जात होते. या परिमंडळाचे विभाजन करण्याची घोषणा ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.