‘ड्रोन’व्दारे गावठाणांच्या मोजणीसाठी विभागीय आयुक्तांनी मागविले कृती आराखडे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:18 AM2021-02-14T04:18:08+5:302021-02-14T04:18:08+5:30
संतोष येलकर अकोला: गावठाणातील मालमत्तांची ‘ड्रोन’व्दारे मोजणी करण्याचे काम अकोला जिल्ह्यात सुरू करण्यात आले. अमरावती विभागातील उर्वरित चार जिल्ह्यातही ...
संतोष येलकर
अकोला: गावठाणातील मालमत्तांची ‘ड्रोन’व्दारे मोजणी करण्याचे काम अकोला जिल्ह्यात सुरू करण्यात आले. अमरावती विभागातील उर्वरित चार जिल्ह्यातही हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्यासाठी अमरावती विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी ‘ड्रोन’व्दारे गावठाणांतील मालमत्ता मोजणीसाठी जिल्हानिहाय कृती आराखडे मागविले असून, यासंदर्भात ११ फेब्रुवारी रोजी विभागातील महसूल उपजिल्हाधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले.
अमरावती विभागातील अकोला जिल्ह्यात ग्रामीण भागातील सर्व गावांमध्ये गावठाणांमधील मालमत्तांची ‘ड्रोन’व्दारे मोजणी करुन , नागरिकांना अद्ययावत मालमत्तापत्रक उपलब्ध करण्याचे काम गत महिनाभरापासून सुरु करण्यात आले. त्यामध्ये जानेवारी अखेरपर्यंत जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील सर्व गावठाणांतील मालमत्तांची मोजणी करण्याचे काम पूर्ण करण्यात आले असून, येत्या एप्रिल अखेरपर्यंत जिल्ह्यातील सर्व गावांमधील मालमत्तांची ‘ड्रोन’व्दारे मोजणी करण्याचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. अकोला जिल्ह्याप्रमाणेच अमरावती विभागातील उर्वरित अमरावती, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ या चार जिल्ह्यातही ‘ड्रोन’व्दारे गावठाणांतील मालमत्तांची मोजणी करण्याचा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्यासाठी चारही जिल्ह्यातील महसूल विभागाने नियोजन करुन, ‘डोन’व्दारे गावठाणांतील मालमत्ता मोजणीसाठी जिल्हानिहाय कृती आराखडे विभागीय आयुक्त कार्यालयाकडे सादर करण्याचे निर्देश अमरावती विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी ११ फेब्रुवारी रोजी विभागीय आयुक्त कार्यालयात विभागातील निवासी उपजिल्हाधिकारी व महसूल उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले.त्यानुसार अमरावती विभागातील अकोला जिल्ह्याप्रमाणेच अमरावती, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ या चार जिल्ह्यातही गावठाणांतील मालमत्तांची ‘ड्रोन’व्दारे मोजणीचे काम लवकरच सुरु होण्याची शक्यता आहे.