दिव्यांग आर्ट गॅलरी देणार दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2019 10:23 AM2019-08-21T10:23:31+5:302019-08-21T10:24:14+5:30

दिव्यांग आर्ट गॅलरी आता दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना राबविणार आहे.

Divya Art Gallery will provide scholarships to students with disabilities | दिव्यांग आर्ट गॅलरी देणार दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

दिव्यांग आर्ट गॅलरी देणार दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: विविध उपक्रमातून दिव्यांगांसाठी शिक्षण व रोजगाराची संधी उपलब्ध करणारे दिव्यांग आर्ट गॅलरी आता दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना राबविणार आहे. या योजनेचा लाभ विदर्भातील दिव्यांग विद्यार्थ्यांना मिळणार असून, या अंतर्गत दिव्यांगांना शिक्षण व रोजगार निर्मिती यावर विशेष भर राहणार आहे.
शिवाजी महाविद्यालयाच्या ग्रंथालयात दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी दिव्यांग आर्ट गॅलरीने विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत; परंतु आर्थिक बाजू कमकुवत असल्याने बहुतांश दिव्यांग विद्यार्थ्यांना येथे येऊन शिक्षण घेणे शक्य नाही. दिव्यांग विद्यार्थ्यांची ही अडचण लक्षात घेत प्रा. विशाल कोरडे यांनी दिव्यांग आर्ट गॅलरीच्या माध्यमातून साक्षर राखी हा उपक्रम जिल्ह्यात राबविला. या उपक्रमांतर्गत दिव्यांगांनी राख्यांची निर्मिती करून स्वयंरोजगाराचे उदाहरण समाजासमोर ठेवले आहे. यातून मिळालेल्या उत्पन्नातून दिव्यांग विद्यार्थ्यांची शैक्षणिक गरज भागविली जाणार आहे. शिष्यवृत्ती योजनेला आणखी मजबूत करण्यासाठी दिव्यांग आर्ट गॅलरीतर्फे आगामी सणसमारंभात विविध उत्पादनाची बाजारात विक्री करणार असल्याची माहिती गजानन भांबुरकर यांनी दिली. या सर्व उत्पादनाच्या विक्रीतून मिळणारा निधी दिव्यांग बांधवांच्या शिक्षणासाठी वापरला जाणार आहे. या उपक्रमांतर्गत ज्या दिव्यांग बांधवानी आर्थिक अडचणींमुळे आपले शिक्षण सोडले असेल त्यांनाही दिव्यांग आर्ट गॅलरी शिक्षणासाठी मदतीचा हात देणार आहे.
गतवर्षी २० दिव्यांगांना शिष्यवृत्ती
४दिव्यांग आर्ट गॅलरीतर्फे गतवर्षी २० दिव्यांग विद्यार्थ्यांना विशेष शिष्यवृत्ती देण्यात आली होती. यामध्ये गणवेश, ब्रेल बुक्स, सीडी, ध्वनिमुद्रित अभ्यासक्रम, पांढऱ्या काठ्या इत्यादी साधने उपलब्ध करण्यात आली होती.


२५ सप्टेंबरपर्यंत सादर करा अर्ज
या शिष्यवृत्तीसाठी संपूर्ण विदर्भातून अर्ज मागविण्यात येत आहे. त्यासाठी भरलेला अर्ज, अपंगत्व प्रमाणपत्र, जन्मतारखेचा दाखला, उत्पन्न प्रमाणपत्र, शाळा, महाविद्यालयात शिकत असल्याचे प्रमाणपत्र, दोन पासपोर्ट फोटो, बँक खाते क्रमांत इत्यादी दस्तऐवजांसह २५ सप्टेंबरपर्यंत अकोल्यातील शिवाजी महाविद्यालय येथे प्रा. विशाल कोरडे यांच्याकडे सादर करावे, असे आवाहन दिव्यांग आर्ट गॅलरीतर्फे करण्यात आले आहे.

यावर्षी ही विदर्भातील शंभर आर्थिकदृष्ट्या कमकुवत अशा शंभर दिव्यांग विद्यार्थ्यांना लुईस ब्रेल व डॉ. हेलन केलर यांच्या नावाने दिव्यांग शिक्षण शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. याचा लाभ दिव्यांग विद्यार्थ्यांनी घ्यावा.
- प्रा. विशाल कोरडे,
संस्थापक अध्यक्ष, दिव्यांग आर्ट गॅलरी, अकोला

Web Title: Divya Art Gallery will provide scholarships to students with disabilities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.