दिव्यांग आर्ट गॅलरी स्वीकारणार पूरग्रस्त अनाथांचे शैक्षणिक पालकत्व!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2019 04:23 PM2019-09-01T16:23:43+5:302019-09-01T16:23:51+5:30
पूरग्रस्त अनाथांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारण्याचा संकल्प दिव्यांग आर्ट गॅलरीतर्फे करण्यात आला आहे.
अकोला : गणेशोत्सवात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात ‘दृष्टी गणेशा’ या संगीतमय कार्यक्रमाच्या माध्यमातून पूरग्रस्त अनाथांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारण्याचा संकल्प दिव्यांग आर्ट गॅलरीतर्फे करण्यात आला आहे. गतवर्षी ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’, रक्तदान यासह विविध सामाजिक विषयांवर दिव्यांग आर्ट गॅलरीतर्फे जनजागृती करण्यात आली होती.
दिव्यांग आर्ट गॅलरीतर्फे गत पाच वर्षांपासून गणेशोत्सवात ‘दृष्टी गणेशा’ या संगीतमय कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जातात. गतवर्षी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये या कार्यक्रमांतर्गत रक्तदान, अवयवदान, पर्यावरण रक्षण, ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ आदी सामाजिक विषयांवर जनजागृती करण्यात आली होती. यंदाही या विषयांवर जनजागृती करण्यात येणार आहे. सोबतच कोल्हापूर, सांगली येथील पूरग्रस्त अनाथ मुलांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारण्याचा संकल्प दिव्यांग आर्ट गॅलरीतर्फे करण्यात आला आहे. याशिवाय, दिव्यांग आर्ट गॅलरीतर्फे दरवर्षी १०० दिव्यांग बांधवांना शिष्यवृत्ती देण्याचा संकल्प करण्यात आला आहे. ‘दृष्टी गणेशा’ या कार्यक्रमात दिव्यांग आर्ट गॅलरीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. विशाल कोरडे हे आपल्या चमूसह संगीताच्या माध्यमातून विविध सामाजिक विषयांची जनजागृती करतील. कार्यक्रमात प्रा. विशाल कोरडे, प्रा. अरविंद देव, प्रा. गजानन मानकर, नितीन खंडारे, माधुरी तायडे, पूर्वा धुमाळे, स्वाती मेश्राम, गौरी शेंगोकार, शीतल रायबोले, मयूरी सुळे, मनोहर काळे, प्रसन्ना तापी, अनुप तायडे, शशांक जहागीरदार इत्यादी कलावंत आपले संगीतमय प्रदर्शन करणार आहेत. उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. राजेश बोंडे, डॉ. सतीश उटांगळे, दंत तज्ज्ञ डॉ. विद्या जयस्वाल, धनंजय भगत, अक्षय राऊत, शिवाजी भोसले, दिव्यांग आर्ट गॅलरीचे गजानन भांबुरकर, प्रसाद झाडे, जानवी राठोड, श्रीकांत तळोकार, तृप्ती भाटिया, स्मिता अग्रवाल, भारती शेंडे, डॉ. संजय तिडके व प्रा. सोनल कामे परिश्रम घेत आहेत.