शासनाचे निर्देश असतानाही दिव्यांग परिचारिकांना कामातून सूट नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 10:34 AM2020-05-23T10:34:44+5:302020-05-23T10:34:56+5:30
राज्य शासनाने २ मे रोजी परिपत्रक काढत दिव्यांग परिचारिकांना कामातून सूट देण्याचे निर्देश दिले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशा परिस्थितीत अकोला जिल्ह्यात शेकडो दिव्यांग, कर्मचारी, अधिकारी, आरोग्यसेवक, परिचारिका सेवा देत आहेत.
त्यांना सेवा देताना, घरून कामाच्या ठिकाणी जाताना, येताना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे राज्य शासनाने २ मे रोजी परिपत्रक काढत दिव्यांग परिचारिकांना कामातून सूट देण्याचे निर्देश दिले आहेत; परंतु सर्वोपचार रुग्णालय व इतर रुग्णालयांमधील परिचारिकांना जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणेने सूट दिली नाही. संघटनेने सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा केल्यानंतरही त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे राज्य दिव्यांग अधिकारी, कर्मचारी संघटना दिव्यांग कल्याण आयुक्तांकडे तक्रार करणार आहे.
कोरोनाच्या संकटकाळात दिव्यांग अधिकारी, कर्मचारी, आरोग्यसेवक, परिचारिका, अधिपरिचारिका सेवा देत आहेत. त्यांना घरून येताना अडचणींचा सामना करावा लागतो. त्रास होतो. त्यामुळे राज्य शासनाने निर्णय घेत, २ मे रोजी जिल्हाधिकाऱ्यांना दिव्यांग अधिकारी, कर्मचारी, परिचारिका, अधिपरिचारिकांना कामातून सूट देण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार सर्वोपचार रुग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील परिचारिकांनी अधिष्ठाता यांच्याकडे अर्ज केला; परंतु अधिष्ठाता यांनी त्यांचा अर्ज नाकारला. शासनाचे स्पष्ट निर्देश असतानासुद्धा आरोग्य यंत्रणेतील अधिकारी कामातून सूट द्यायला तयार नाहीत. यंत्रणेकडून शासनाच्याच नियमांचे उल्लंघन होत आहे. त्यामुळे त्यांची दिव्यांग कल्याण आयुक्तांकडे राज्य दिव्यांग अधिकारी, कर्मचारी संघटनेच्यावतीने तक्रार
करण्यात येणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष संजय बरडे, सचिव मोहम्मद अ. अजीज, अविनाश वडतकर, जावेद इकबाल व सुधीर कडू यांनी सांगितले.