दिवाळीपूर्वी शेतकर्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याची भूमिका!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2017 02:08 AM2017-10-05T02:08:50+5:302017-10-05T02:09:48+5:30
अकोला : कर्जमाफी योजनेंतर्गत शेतकर्यांनी ऑनलाइन भरलेल्या अर्जांची छाननी तातडीने पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू असून, दिवाळीपूर्वी शेतकर्यांना कर्जमाफीचा लाभ मिळावा, अशी आमची भूमिका असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी बुधवारी येथे दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : कर्जमाफी योजनेंतर्गत शेतकर्यांनी ऑनलाइन भरलेल्या अर्जांची छाननी तातडीने पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू असून, दिवाळीपूर्वी शेतकर्यांना कर्जमाफीचा लाभ मिळावा, अशी आमची भूमिका असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी बुधवारी येथे दिली.
कर्जमाफी योजनेचा आढावा घेण्यासाठी दिवाकर रावते अकोल्यात आले असता, पत्रकारांशी ते बोलत होते. मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विदर्भात कमी झालेला पाऊस, त्यामुळे पाण्याची कमतरता आणि कर्जमाफीच्या मुद्यावर चर्चा करण्यात आली. त्यामध्ये दिवाळीपूर्वी शेतकर्यांना कर्जमाफीचा लाभ देणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले, असे रावते म्हणाले. कर्जमाफीसाठी शेतकर्यांनी ऑनलाइन भरलेल्या अर्जांची छाननी तातडीने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू असून, ग्रामपंचायत निवडणुका नसलेल्या गावांमध्ये चावडी वाचनाद्वारे कर्जमाफीच्या अर्जांच्या छाननीचे काम पूर्ण झाले असून, ग्रामपंचायत निवडणुका असलेल्या गावांमधील कर्जमाफीच्या अर्जांचे चावडी वाचन रखडले आहे; मात्र कर्जमाफी अर्जांच्या चावडी वाचनासाठी ग्रामपंचायत निवडणुकीच्या आचारसंहितेची अडचण नसावी, त्यामुळे यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाकडे मागणी करण्यात आल्याचे ते म्हणाले.कर्जमाफीसाठी पात्र ठरणारे शेतकरी इत्यादी मुद्यांचा आढावा घेण्यासाठी विदर्भातील ११ जिल्हय़ांचा दौरा अकोल्यापासून सुरू केल्याचेही रावते यांनी स्पष्ट केले.
यावेळी शिवसेनेचे सहायक संपर्कप्रमुख श्रीरंग पिंजरकर, माजी आमदार संजय गावंडे, अँड. अनिल काळे उपस्थित होते.
किमान एका शेतकर्याचा सात-बारा कोरा झाला पाहिजे!
कर्जमाफी योजनेत किमान एक शेतकर्याचा सात-बारा कोरा झाला पाहिजे, असा शिवसेनेचा आग्रह असल्याचे दिवाकर राव ते यांनी सांगितले. एका शेतकरी कुटुंबात पतीकडे एक लाख रु पये आणि पत्नीकडे ८0 हजार रुपये कर्ज आहे, अशा शेतकरी कुटुंबाला दीड लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ दिला पाहिजे, असे उदाहरणही रावते यांनी यावेळी दिले.