स्वरचैतन्यातून उजळली दीपोत्सवाची पहाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2017 01:11 PM2017-10-20T13:11:51+5:302017-10-20T13:13:34+5:30
अपूर्व उत्साहात रसिकांना श्रवणसुखाची, स्वरचैतन्याची अनुभूती लोकमतच्या वतिने आयोजित दिवाळी पहाट मैफलीत श्रोत्यांना झाली.
अकोला : लक्ष्मीपूजनाच्या रम्य सकाळी प्रसिद्ध गायक अनंद जहागीरदार व त्यांच्या चमुने सादर केलेल्या गितांमधून झालेली स्वराजांची पुष्पवृष्टी, मंगेश राऊत यांचे बहारदार तबलावादन आणि शंतनू जागीरदार व सतीश रूद्रकार यांची सिंथेसायझर व की-पॅडवर मिळालेली साथ असा अनोखा संगीतमय दिवाळी फराळाचा आस्वाद अकोलेकरांना मिळाला. अभिजात शास्त्रीय संगीत आणि आधुनिक संगीतातील सत्व असे आधुनिकता आणि पंरपरेचे दर्शन घडवित दिपोत्स्वाची पहाट उजळली. अपूर्व उत्साहात रसिकांना श्रवणसुखाची, स्वरचैतन्याची अनुभूती लोकमतच्या वतिने आयोजित दिवाळी पहाट मैफलीत श्रोत्यांना झाली.
नेहरू पार्क च्या परिसरात दीपोत्सवातील लक्ष्मीपूजनाची दिवाळी पहाट स्वरचैतन्याने उजळून निघाली. प्रारंभी लोकमत चे संस्थापक संपादक आणि ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमचे पूजन करण्यात आले. मोहक फुलांची सजावट, वेधक रंगावली आणि परिसर उजळून टाकणाºया दीपोत्सवात स्वरांचा अनोखा उत्सव, मैफल सुरू झाली. गणेशसत्वनने सुरू झालेल्या या मैफलीमध्ये शास्त्रीय तसेच भावगीतांनी रंग भरला. आनंद जगीरदार, मदन खुणे, तनुश्री भालेराव यांनी सादर केलेल्या एकापेक्षा एक सरस गितांनी संपूर्ण परिसर भारून टाकला. आली माझ्या घरी ही दिवाळी..या गिताशिवाय कोणतीही दिवाळीची मैफल संपूच शकत नाही. या स्वरमैफलीमध्ये हे गित सादर झाल्यावर रसिकांनी दिलेली दाद दिवाळीचे स्वागत करणारी ठरली तसेच स्वरतालाची मैफल बहरून गेली. . सजल नयन नित धार बरसती या भैरवीने मैफलीची सांगता झाली त्यावेळी मैफलीमध्ये सुर्यकिरणांनानीही हजेरी लावली होती. या संपूर्ण मैफलीचे तेवढेचे सुंदर व नेटक्या शब्दांसह सुरेल आवाजात जाई विद्यासागर हिने निवेदन केले.
पहाटे पाच पासूनच रसिकांचे आगमन झाले प्रत्येकांनी एक पणती प्रज्वलीत करून दिपोत्सवाच्या पहाटेला आणखीच उजळवून टाकले. यावेळी लोकमत च्या वतिने प्रकाशीत करण्यात आलेल्या दीपोत्सव व दीपभव या दिवाळी विशेषांकाचेही प्रदर्शन लावण्यात आले होते. रसीकांनी या दोन्ही विशेषांकांवर पसंतीचे मोहर उमटवली या मैफलीसाठी शंकर साऊंड सर्व्हीस तसेच महाविर बिछायत केंद्र यांचे सहकार्य मिळाले.
लोकमत वृत्तपत्र समूहाच्या वतीने अकोल्याच्या सांस्कृतिक विकासात मानदंड निर्माण केले आहेत. त्यापैकी दिवाळी पहाट हा एक उपक्रम आहे. दरवर्षी सूरांचा अनोखा फराळ अकोलेकरांना देण्याचा प्रयत्न लोकमतने केला असल्याच्या प्रतिक्रीया रसीक श्रोत्यांनी यावेळी दिल्या.कार्यक्रमाला प्रभात किडस्चे संचालक डॉ.गजानन नारे, ज्येष्ठ रंगकर्मी प्रा.मधू जाधव, राष्टÑवादीचे नेते श्रीकांत पीसे पाटील, आरएलटी कॉलेजचे डॉ. विजय नानोटी, नीवन धोतकर, डॉ.बोराखडे, गुलशन कृपलानी, जितेंद्र डहाके, बाबुराव देशमुख, कृणाल देशमुख आदींसह रसीक श्रोते उपस्थित होते.