दिवाळी धमाका शंभर कोटींचा!

By admin | Published: November 1, 2016 02:11 AM2016-11-01T02:11:59+5:302016-11-01T02:11:59+5:30

अकोल्यात एका दिवसात झाली पाच कोटींची आतषबाजी.

Diwali Explosion 100 Crore! | दिवाळी धमाका शंभर कोटींचा!

दिवाळी धमाका शंभर कोटींचा!

Next

अकोला, दि. ३१- सणांचा राजा असलेला दिवाळी सण अकोलेकरांनी धूमधडाक्यात साजरा केला. सोन्याचे दागिने, किराणा, रेडिमेड कापड, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, वाहन, दिवाळीच्या निमित्ताने रंग, भेटवस्तू, मिठाई आणि बाजारपेठेतील चिल्लर बाजारात आणि फटाक्यांवर अकोलेकरांनी तब्बल शंभर कोटींचा धमाका करीत दिवाळी साजरी केली. लक्ष्मी पूजनाच्या एका दिवसांत पाच कोटींच्या फटाक्यांचा बार अकोलेकरांनी उडविला आहे.
दिवाळीच्या निमित्ताने सर्वांत जास्त उलाढाल नेहमीप्रमाणे किराण्यावर नोंदविली गेली आहे. ३७ कोटी ५८ लाख रुपयांची उलाढाल दिवाळीच्या निमित्ताने अकोल्यात झाली. गुळ, नारळ, ड्रायफ्रूट, तूप, तेल आणि हरभरा डाळीला विशेष मागणी दिवाळी निमित्ताने होती. दिवाळीच्या काही दिवस आधीपासून बाजार तेजीत राहिला. धनत्रयोदशी साडेतीन मुहुर्तापैकी एक मुहूर्त असल्याने वस्तू खरेदीचा कल या दिवशी प्रत्येकाचा होता. सोन्याच्या खरेदीत अकोलेकरांनी विक्रम केला. अकोल्यात असलेल्या १२0 सराफा दुकानदारांचा व्यवसाय दोन दिवसात २८ कोटींच्या घरात मोजला गेला. धनतेरसचा एका दिवसाचा २५ कोटी आणि त्यानंतर ३ कोटींची उलाढाल झाली. शहरातील २0 प्रमुख दुकानदारांचा व्यवसाय यामध्ये मोठा आहे, असेही सराफातील तज्ज्ञांनी सांगितले. मोटारसायकलच्या खरेदीतही तेजी कायम होती. धनतेरसच्या एका दिवसात ५00 मोटारसायकली विकल्या गेल्यात. शहरातील सर्व शोरूम्समधील ५00 मोटारसायकली विकल्या, अशी माहिती शहरातील एका शोरूम संचालकाने लोकमतशी बोलताना दिली. रेडिमेड कापडांवरही अंदाजे ४ ते ५ कोटींची उलाढाल झाली. दिवाळीच्या दिवशी दुपारपर्यंत झालेल्या विक्रीची नोंद यामध्ये घेतली गेली. मागिल वर्षांच्या तुलनेत यंदा फटाक्यांची आतषबाजी कमी होती. प्रदूषणाच्या जागरूकतेमुळे आकाशात उडणार्‍या फटाक्यांची मागणी जास्त राहिली. जवळपास पाच कोटींचा धूर अकोलेकरांनी फटाक्यातून आकाशात सोडला.

चारचाकी गाड्यांची विक्री वेगळी
दिवाळीनिमित्ताने चारचाकी गाड्यांची विक्री दसर्‍याच्या तुलनेत कमी झाली आहे; मात्र त्याची नेमकी आकडेवारी तज्ज्ञांकडून मिळू शकली नाही. ही आकडेवारीदेखील कोट्यवधींच्या घरातच आहे.


-दिवाळीनिमित्त रेडिमेड कापडांवरही मोठी उलाढाल बाजारपेठेत झाली. रेडिमेड कापडाचे मोठे दुकान ५0 आहेत. किमान चार लाख रुपयांचा व्यवसाय या दुकानदारांनी केला. सोबतच लहान दुकानदारांची संख्या १00 आणि मार्गावर असलेल्या दुकानदारांची संख्या २00 च्या घरात आहे. प्रत्येकाची सरासरी उलाढाल ५0 ते ७५ हजाराच्या घरात जाते. रेडिमेड कापडांवर चार ते पाच कोटींची उलाढाल अकोल्यात झाली.
-देवानंद ताले, रेडिमेड कापड दुकानदार, अकोला.

Web Title: Diwali Explosion 100 Crore!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.