दिवाळीतील रेल्वे आरक्षण १२० दिवस आधीच झाले फुल्ल
By Atul.jaiswal | Published: July 17, 2023 08:17 PM2023-07-17T20:17:49+5:302023-07-17T20:19:36+5:30
मुंबई-पुण्याहून अकोल्यासाठी आरक्षण मिळेना, प्रतीक्षा यादी किमान ६३ वर
अतुल जयस्वाल, अकोला: नोकरी-व्यवसाय किंवा शिक्षणानिमित्त मुंबई व पुणे या महानगरांमध्ये वास्तव्यास असलेले अकोलेकर दिवाळीत आपल्या घरी येण्यासाठी आसुसलेले असतात. सणा-सुदीच्या दिवसांमध्ये गावी परत येण्यासाठी रेल्वे हा सर्वात स्वस्त व साेयीचा पर्याय असल्याने १२० दिवस आधी मुंबई, पुणे येथून दिवाळीच्या आधीचा दिवस अर्थात ११ नोव्हेंबरचे आरक्षण फुल्ल झाले आहे. परिणामी अनेक अकोलेकरांना गावी परत येण्यासाठी आरक्षण मिळत नसल्याचे चित्र आहे.
रेल्वेच्या नियमाप्रमाणे ११ नोव्हेंबर २०२३ चे दिवाळी आरक्षण १२० दिवस आधी सुरू झाले आणि अवघ्या काही मिनिटात आरक्षण फुल्लही झाले. अनेकांना तिकीट खिडकीवरून ‘वेटिंग’ तिकीट घेऊन परतावे लागले तर ऑनलाइन बुकिंग करणाऱ्यांना ‘रिग्रेट’ मेसेज पाहावा लागला. आपल्या हक्काच्या रेल्वेत कन्फर्म तिकीट मिळवायला झगडावे लागत आहे, अशी तीव्र भावना प्रवाशांमधून व्यक्त होत आहे.
खरोखरच फुल्ल की आणखी काही
मुंबई - नागपूर, पुणे- नागपूर मार्गावर इतक्या गाडय़ा धावत असताना दुसऱ्या मिनिटाला गाडय़ा फुल्ल होऊन रिग्रेट मेसेज कसा काय झळकू शकतो, यात नक्कीच काहीतरी गडबड आहे. एजंट आणि रेल्वेचे अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या साटेलोट्यातून हा प्रकार घडत आहे का, याची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे.
अतिरिक्त रेल्वे गाड्या सोडा!
दरवर्षी दिवाळीत अवघ्या काही मिनिटांत आरक्षण फुल्ल होते. त्यामुळे प्रवाश्यांना गावी जाताना अडचणींचा सामना करावा लागतो. रेल्वे प्रशासनाने याची चौकशी करावी. दलालांवर नियंत्रण ठेवावे. तसेच विदर्भातील प्रवाशांच्या सोयीसाठी दिवाळीत अतिरिक्त रेल्वे गाड्या सोडाव्या. केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना पत्र लिहून आरक्षणातील गैरप्रकारांची चौकशी करण्याची मागणी करणार आहोत. -ॲड. अमोल इंगळे, रेल्वे प्रवाशी संघटना
११ नोव्हेंबर २०२३ स्लीपर कोच आरक्षण स्थिती
मुंबई ते अकोला
- ज्ञानेश्वरी एक्स्प्रेस - ६३ वेटिंग
- भुवनेश्वर एक्सप्रेस - ७९ वेटिंग
- गीतांजली एक्स्प्रेस - ९८ वेटिंग
- विदर्भ एक्स्प्रेस - १३५ वेटिंग
- मेल एक्स्प्रेस - ६४ वेटिंग
- अमरावती एक्स्प्रेस - १०५ वेटिंग
- शालिमार एक्स्प्रेस - ७५ वेटिंग