फाटले आभाळ ज्यांचे हो तयांचा सोबती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2021 12:06 PM2021-11-08T12:06:11+5:302021-11-08T12:08:43+5:30
Akola News : स्वराज फाउंडेशनचे पुरुषोत्तम शिंदे यांनी गरजूंना नवे कपडे व फराळाचे वाटप करून त्यांची दिवाळी गोड केली.
- अतुल जयस्वाल
अकोला : ‘फाटले आभाळ ज्यांचे हो तयांचा सोबती’ या काव्यपंक्तीला अनुसरून अकोल्यातील एक अवलिया गत १६ वर्षांपासून गोरगरीब, वंचित, उपेक्षित जणांची दिवाळी साजरी करीत आहे. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही संकलित झालेल्या रद्दीच्या विक्रीतून मिळालेले पैसे व काही दात्यांच्या सहकार्याने स्वराज फाउंडेशनचे पुरुषोत्तम शिंदे यांनी गरजूंना नवे कपडे व फराळाचे वाटप करून त्यांची दिवाळी गोड केली. पुरुषोत्तम शिंदे यांनी वंचितांची दिवाळी साजरी करण्याचा ध्यास घेतला असून, गत १६ वर्षांपासून ते हा उपक्रम राबवीत आहेत. दरवर्षीप्रमाणे आपल्या सहकाऱ्यांसोबत दिवाळीच्या आदल्या दिवशी गोरगरिबांना कपडे व फराळ वाटपाचा उपक्रम सुरू करण्यात आला. या अंतर्गत जठार पेठ भागातील गजानन महाराज मंदिर परिसर, सातव चौक, जिल्हा स्त्री-रुग्णालय, सर्वोपचार रुग्णालय परिसरातील गरजूंना कपडे व फराळाचे वितरण करण्यात आले. लक्ष्मीपूजन व भाऊबीजेच्या दिवशीही शहरातील विविध ठिकाणी हा उपक्रम राबविण्यात आला. पुरुषोत्तम शिंदे यांना या कामात संदीप दाभाडे, शंतनू शिंदे व अक्षय खाडे यांचे सहकार्य लाभले.
साडी, लुगडं व लहान मुलांचे कपडे
स्वराज फाउंडेशनने रद्दी विकून मिळालेल्या पैशांतून साडी, लुगडे, धोतर व लहान मुलांचे कपडे खरेदी केले. सलग तीन दिवस शहरातील विविध भागांत जाऊन गोरगरीब व गरजूंना या कपड्यांचे वितरण करण्यात आले. या माध्यमातून तब्बल ६०० उपेक्षित जणांची दिवाळी गोड झाली.
२००० किलो रद्दी संकलित
स्वराज फाउंडेशनच्या हाकेस ओ देऊन अकोलेकरांनी सात रद्दी संकलन केंद्रांवर रद्दी जमा केली. दिवाळीपर्यंत तब्बल २००० किलो रद्दी संकलित झाली. ही रद्दी विकून मिळालेले पैसे, काही सेवाभावी संस्था आणि व्यक्तींच्या सहकार्याने दिवाळीचा फराळ व कपडे खरेदी करून ते गरजूंना वितरित करण्यात आले.