केशवनगरमध्ये चोरट्यांची ‘दिवाळी’
By admin | Published: November 1, 2016 02:10 AM2016-11-01T02:10:01+5:302016-11-01T02:10:01+5:30
तीन घरे फोडली; दीड लाखांचा ऐवज लंपास.
अकोला, दि. ३१- चोरट्यांनी केशवनगरमधील तीन घरे फोडून तब्बल दीड लाख रुपयांचा ऐवज लंपास केला असून दिवाळीच्या दिवशी पूजेजवळ ठेवलेल्या रकमेवर चोरट्यांनी हात साफ केल्याची घटना सोमवारी उघड झाली. , खदान पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
केशवनगरमधील मराठा कॉलनी येथील रहिवासी गोपाल विनायकराव मोहोकार यांच्या घरी अज्ञात चोरट्यांनी रविवारी रात्री प्रवेश करून घरातील २९ हजार ५00 रुपये रोख रक्कम लंपास केली.
यासोबतच मोहोकार यांचे शेजारी ओंकारसिंह ठाकूर यांच्या घरातून चोरट्यांनी ६५ हजार रुपये लंपास केले, तर त्या बाजूलाच असलेल्या पागृत यांच्या घरातून चोरट्यांनी रोख ७ हजार रुपये व मुद्देमाल लंपास केला. यानंतर पोलीस विभागात कार्यरत असलेल्या एका कर्मचार्याच्या घरातही चोरीचा प्रयत्न या चोरटयांनी केल्याची माहिती आहे. अशाप्रकारे तीन घरातून चोरट्यांनी सुमारे दीड लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणाची माहिती मिळताच खदानचे ठाणेदार गजानन शेळके कर्मचार्यांसह घटनास्थळावर दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून तपास सुरू केला. यावेळी घटनास्थळावर श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते. या प्रकरणी खदान पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ४५७, ३८0 नुसार गुन्हा दाखल केला आहे.