नाला सफाईची कामे तातडीने निकाली काढा! - मनपा आयुक्तांचे निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 02:46 PM2019-05-31T14:46:00+5:302019-05-31T14:46:45+5:30
महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी झोन अधिकाऱ्यांना अग्रिम रकमेचे वाटप केले असून, नाला सफाईची कामे प्रामाणिकपणे पार पाडण्याचे निर्देश दिले आहेत.
अकोला: शहरातील मोठ्या नाल्यांची मान्सूनपूर्व साफसफाई करण्यासाठी महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी झोन अधिकाऱ्यांना अग्रिम रकमेचे वाटप केले असून, नाला सफाईची कामे प्रामाणिकपणे पार पाडण्याचे निर्देश दिले आहेत. नाल्याची रुंदी व खोली लक्षात घेता त्यामधून नेमका किती क्युबिक मीटर गाळ निघू शकतो, यासंदर्भात आयुक्तांनी संबंधितांना सूचना केल्याची माहिती आहे.
शहरातील प्रमुख मोठ्या नाल्यांची प्रामाणिकपणे स्वच्छता केल्यास पावसाळ्यात सखल भागातील रहिवाशांच्या घरात पाणी साचणार नाही, याची तसदी घेण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. त्यानुषंगाने किमान एक मीटरपेक्षा मोठ्या नाल्यांची सफाई करण्याचा निर्णय आयुक्त संजय कापडणीस यांनी घेतला असून, क्षेत्रीय अधिकाºयांना निर्देश दिले आहेत. नाला सफाईसाठी पूर्व झोनकरिता सहा लाख रुपये व उर्वरित इतर तीन झोनसाठी प्रत्येकी पाच लाख रुपयांची अग्रिम रक्कम झोन अधिकाºयांकडे सुपूर्द करण्यात आल्याची माहिती आहे.
महापालिकेत खांदेपालट
मनपाच्या सहायक आयुक्त डॉ. दीपाली भोसले, सहायक आयुक्त पूनम कळंबे परीक्षेच्या कारणास्तव दीर्घ रजेवर आहेत. त्यामुळे झोन कार्यालयांचा कारभार विस्कळीत झाला. यासोबतच उत्तर झोनचे क्षेत्रीय अधिकारी वासुदेव वाघाडकर, दक्षिण झोनचे क्षेत्रीय अधिकारी राजेंद्र घनबहादूर जून महिन्याच्या अखेरीस सेवानिवृत्त होतील. या दोन्ही अधिकाºयांनी दीर्घ रजा घेतल्यामुळे आयुक्त संजय कापडणीस यांनी उत्तर झोनच्या क्षेत्रीय अधिकारी पदाची सूत्रे विठ्ठल देवकते तर दक्षिण झोनची सूत्रे प्रशांत राजुरकर यांच्याकडे सोपविली आहेत.
शहरात नाला सफाईला सुरुवात
मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी क्षेत्रीय अधिकाºयांना अग्रिम रक्कम दिल्यानंतर क्षेत्रीय अधिकाºयांनी नाला सफाईच्या कामाला सुरुवात केल्याचे चित्र समोर आले आहे. आरोग्य निरीक्षकांनी ही कामे थातूरमातूर न करता प्रामाणिकपणे निकाली काढण्याची अपेक्षा वर्तविली जात आहे.