पिककर्जासाठी शेतकऱ्यांना त्रास देऊ नका - भाजप शिष्टमंडळाचा इशारा
By atul.jaiswal | Published: June 26, 2018 05:29 PM2018-06-26T17:29:28+5:302018-06-26T17:31:56+5:30
अकोला : शेतकऱ्यांना पीककर्ज देताना राष्ट्रीयीकृत बँका त्रास देत असतील तर त्यांचा योग्य रीतीने बंदोबस्त करण्यात येईल,असा इशारा आमदार रणधीर सावरकर यांच्या नेतृत्वाखालील जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात व महानगर अध्यक्ष किशोर मांगटे पाटील यांच्या शिष्टमंडळाने बुधवारी विविध बँकांच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्याला सुखी समृद्ध करण्यासाठी अनेक योजना सुरू केल्या. तसेच कर्ज कर्जपुरवठा साठी १३२८ कोटी रुपये उपलब्ध करुण दिले. त्यापैकी १३० कोटी जिल्हा बँकांनी वाटप केले; पण राष्ट्रीयकृत बँकांनी फक्त ७० कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. हा प्रकार सहन केल्या जाणार नाही. दरवर्षीपेक्षा मोठ्या प्रमाणात रक्कम अर्थ विभागाने उपलब्ध करुन दिल्यानंतरही काही बँक अधिकारी शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करून भाजपा सरकारविरुद्ध असंतोष निर्माण होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करीत असून, हा प्रकार जिल्ह्यात खपून घेणार नाही असा इशारा शिष्टमंडळाने दिला. जिल्हाधिकारी तसेच अग्रणी बँकेचे समन्वयक या गंभीर बाबीकडे लक्ष देत नसतील, तर अधिकाऱ्यांच्याा विरोधात आंदोलन उभारले जाईल. जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या भावनांचा उद्रेक झाला, तर याला सर्वस्वी जबाबदार बँक व जिल्हा प्रशासनाचे अधिकारी राहतील असा इशारा आमदार सावरकर यांनी दिला.
आमदार सावरकरांचा पाठपुरावा
आमदार रणधीर सावरकर सतत एक आठवड्यापासून शेतकऱ्यां च्या प्रश्नासाठी प्रत्येक बँकेत जाऊन लढा देत आहेत. आमदार सावरकर यांच्यासह महानगर अध्यक्ष किशोर मांगटे पाटील जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात यांच्यासह भाजपचे शिष्टमंडळाने अकोल्यातील महाराष्ट्र बँक, स्टेट बँक, ओरिएंटल बँक, देना बँक, सेंट्रल बँक आदी बँकेच्या व्यवस्थापकांशी चर्चा करून लवकरात लवकर कर्जवाटपाचा लक्ष्यांक पूर्ण करण्याचा विनंतीवजा इशारा दिला.याप्रसंगी दिला यावेळी गणेश अंधारे, उपसभापती दिनकर गावंडे, जयंत मसने, गणेश कण्डारकर, प्रवीण हगवणे, विवेक भरणे, डॉ. अमित कावरे,अनिल मुरूमकार, दिलीप मिश्रा, विजय परमार, रमेश शिरसाट, शेख रहीम देशमुख , विशाल पाटील आदी कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.