गोवर, रुबेला लसीकरणापासून एकही मूल वंचित ठेवू नका - मनपा आयुक्त जितेंद्र वाघ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 12:52 PM2018-11-21T12:52:39+5:302018-11-21T12:54:14+5:30
लसीकरणापासून एकही मूल वंचित ठेवू नका, असे स्पष्ट निर्देश मनपा आयुक्त जितेंद्र वाघ यांनी मनपाच्या वैद्यकीय आरोग्य यंत्रणेला दिले आहेत.
अकोला: गोवर हा विषाणूपासून होणारा आजार असून, गोवर झालेल्या रुग्णास ताप, पुरळ, सर्दी खोकला किंवा डोळे लाल होणे यापैकी एक लक्षण आढळून येते. अशा रुग्णास न्युमोनिया, अतिसार, मेंदुज्वर आदी जीवघेणे आजार होऊ शकतात. रुबेला हासुद्धा विषाणूपासून जीवघेणा आजार होतो. या आजारावर मात करण्यासाठी शासनाच्या वतीने येत्या २७ नोव्हेंबरपासून राज्यभरात लसीकरण मोहीम राबविली जाणार असून, लसीकरणापासून एकही मूल वंचित ठेवू नका, असे स्पष्ट निर्देश मनपा आयुक्त जितेंद्र वाघ यांनी मनपाच्या वैद्यकीय आरोग्य यंत्रणेला दिले आहेत.
येत्या २७ नोव्हेंबरपासून संपूर्ण शहरात राबवल्या जाणाऱ्या गोवर व रुबेला लसीकरण मोहिमेत वयाची ९ महिने पूर्ण केल्यापासून ते १५ वर्षांपर्यंतच्या सर्व बालकांना मोफत लसीकरण केले जाणार आहे. रुबेला आजारामुळे गर्भवती माता किंवा तिच्या बाळाचा जीव धोक्यात येण्याची शक्यता राहते. या मोहिमेसाठी मनपाच्या वैद्यकीय आरोग्य यंत्रणेने सज्ज राहण्याचे निर्देश मनपा आयुक्त जितेंद्र वाघ यांनी दिले आहेत. वैद्यकीय आरोग्य यंत्रणेच्या वतीने शहरात विविध दहा ठिकाणी नागरी आरोग्य केंद्रे कार्यरत आहेत. या आरोग्य केंद्रांच्या माध्यमातूनही ही मोहीम राबवली जाणार आहे.
१ लाख १५ हजार ४१६ बालकांना लस!
गोवर व रुबेला लसीकरण मोहीम तीन टप्प्यात राबवली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात महापालिका क्षेत्रातील शाळा व अंगणवाडीतील १ लाख १५ हजार ४१६ बालकांना लस दिल्या जाईल. यासाठी मनपाने ८३४ लसीकरण सत्र आयोजित केली आहेत. दुसºया टप्प्यात जिल्हा प्रशासनाच्या वतीने ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालय, सामान्य रुग्णालय, अंगणवाडी यामधून लस देण्यात येईल. तिसºया टप्प्यात वीटभट्टी, तांडे तसेच बाहेर काम करणाºया पालकांच्या पाल्यासाठी सुरक्षित ठिकाणी शिबिर घेऊन लसीकरण मोहीम राबवली जाणार आहे.
इंजेक्शनद्वारे लसीकरण!
मुला-मुलींना ही लस इंजेक्शनद्वारे दिली जाईल. यामध्ये उजव्या हाताच्या दंडावर दिली जाणार असून, लस दिलेल्या बालकाला डाव्या हाताच्या अंगठ्यावर शाईचे निशाण लावण्यात येईल.
या मोहिमेत वयाची नऊ महिने ते १५ वर्ष वयोगटातील मुला-मुलींना लसीकरण केल्या जाणार आहे. कुपोषित बालक , सर्दीने आजारी असणाºया बालकांना लसीकरण करता येणार आहे. मूल गंभीर आजारी असल्यास तो आजारातून बरा झाल्यावरच लस देता येईल. या मोहिमेचा सर्व अकोलेकरांनी लाभ घेण्याची गरज आहे.
- जितेंद्र वाघ, आयुक्त, मनपा