ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नका; जातनिहाय जनगणना करा!
By संतोष येलकर | Published: December 7, 2023 07:14 PM2023-12-07T19:14:45+5:302023-12-07T19:15:45+5:30
सकल ओबीसी महामोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धडकला
अकोला : मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे; मात्र ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नका आणि ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्यात यावी, अशी मागणी करीत ओबीसी महासंघ व अत्यल्प समाज संघटनेच्यावतीने गुरुवार, ७ डिसेंबर रोजी काढण्यात आलेला सकल ओबीसी महामोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धडकला.
ओबीसींच्या संविधानिक आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे, ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्यात यावी, या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेश व अत्यल्प समाज संघटनेच्यावतीने सकल ओबीसी महामोर्चा काढण्यात आला. ओबीसींमधील विविध समाज संघटनांना सोबत घेऊन अकोला क्रिकेट क्लब मैदानजवळून काढण्यात आलेला महामोर्चा अकोला शहरातील विविध मार्गाने मार्गक्रमण करीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धडकला.
संबंधित मागण्यांचे निवेदन एका शिष्टमंडळामार्फत जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्याकडे सादर करण्यात आले. या मोर्चात ओबीसी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष बालमुकुंद भिरड, प्रदेश कार्याध्यक्ष ॲड. संतोष राहाटे, अत्यल्प समाज संघटनेचे अध्यक्ष गोपाल राऊत यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, महिला जिल्हाध्यक्ष प्रभा शिरसाट, भारिप बमसंचे जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे, किरण बोराखडे, तेजस्विनी राहाटे, विजया भिरड, गजानन गवइ, गजानन बोराळे, प्रा.संतोष हुशे,गोपाल काेल्हे, प्रतिभा अवचार, प्रा.मंतोष मोहोड, संजय बावणे, प्रा.सुरेश पाटकर, मीना बावणे, विकास सदांशिव, राम गव्हाणकर यांच्यासह ओबीसींमधील विविध समाजघटकांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
‘जय संविधान, जय ओबीसी’ घोषणांनी दणाणला परिसर !
मोर्चादरम्यान ‘जय संविधान, जय ओबीसी, ओबीसींची जातनिहाय जनगणना झालीच पाहीजे ’ अशा घोषणा देण्यात आल्या. या घोषणांना जिल्हाधिकारी कार्यालय चौक परिसर दणाणून गेला होता.
‘माझे मत आरक्षणवाद्यांनाच’ मोर्चेकऱ्यांनी घेतली प्रतीज्ञा !
मोर्चाच्या समारोपप्रसंगी मोर्चात सहभागी ओबीसी बांधवांना प्रतीज्ञा देण्यात आली. त्यानुसार ‘मी माझे मत आरक्षणवाद्यांनाच देणार ...’ अशी प्रतीक्षा मोर्चेकरी ओबीसी बांधवांनी यावेळी घेतली.
ओबीसींनी एकत्र येण्याची गरज : अंजली आंबेडकर
ओबीसींची जातनिहाय जनगणना झालीच पाहीजे, असे सांगत वेगवेगळ्या जातीमधील घटकांनी ओबीसी म्हणून एकत्र येण्याची गरज आहे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या प्रा.अंजली आंबेडकर यांनी यावेळी केले. आरक्षण टिकविण्यासाठी ओबीसींनी एकत्र येवून राजकीय ताकद वाढविणे गरजेेचे आहे, त्यादृष्टीने पुढच्या काळात जिद्दीने प्रयत्नांची आवश्यकता असल्याचेही त्यांनी सांगितले.