सार्वजनिक ठिकाणी नाहक गर्दी करू नका - संजय धोत्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 12:00 PM2020-03-18T12:00:16+5:302020-03-18T12:01:21+5:30
सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळण्याचे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री ना. संजय धोत्रे यांनी शहरासह जिल्हावासीयांना केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: जागतिक आपत्ती म्हणून घोषित केलेल्या कोरोना विषाणूचा देशासह महाराष्ट्रात शिरकाव झाला आहे. संसर्गजन्य आजाराला आळा घालण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या स्तरावर विविध उपाययोजना केल्या जात असून, सुरक्षिततेसाठी नागरिकांना वेळोवेळी सूचना, निर्देश दिल्या जात आहेत. या आजाराची गंभीरता ध्यानात घेता धार्मिक स्थळे, यात्रा, जत्रा, मेळावा तसेच सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळण्याचे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री ना. संजय धोत्रे यांनी शहरासह जिल्हावासीयांना केले आहे.
कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांवर उपचारासाठी अद्यापही प्रभावी लस उपलब्ध नाही. अशा स्थितीत नागरिकांनी व कुटुंबातील प्रत्येक सदस्याने कमालीची स्वच्छता बाळगून एकमेकांची काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
या संसर्गजन्य आजाराचा झपाट्याने होणारा प्रसार ध्यानात घेता नागरिकांनी प्रत्यक्षात एकमेकांचा संपर्क कमी करण्याची आवश्यकता आहे.
पुढील काही दिवस नागरिकांनी काळजी घेतल्यास या आजाराचा प्रादुर्भाव कमी होणार असल्याने गर्दीच्या ठिकाणी, सार्वजनिक ठिकाणे, हॉटेल, लग्न समारंभ, धार्मिक उत्सव, मेळावे तूर्तास स्थगित करण्याची विनंतीवजा आवाहन भाजपच्यावतीने केंद्रीय राज्यमंत्री ना. संजय धोत्रे, ज्येष्ठ आमदार गोवर्धन शर्मा, भाजप जिल्हाध्यक्ष आ. रणधीर सावरकर, आ. प्रकाश भारसाकळे, आ. हरीश पिंपळे, महानगराध्यक्ष विजय अग्रवाल व महापौर अर्चना मसने यांनी संयुक्त पत्रकाद्वारे केले आहे.
...तर याद राखा!
राष्ट्रीय आपत्तीचा सामना करण्यासाठी सर्वांनी संयम, धैर्य व विवेक बुद्धीचा वापर करण्याची गरज आहे. अशा स्थितीत कोणीही जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी किंवा काळाबाजार केल्यास याद राखा, असा सज्जड दम केंद्रीय राज्यमंत्री ना. धोत्रे यांनी दिला आहे. तसा प्रकार आढळल्यास संबंधितांवर केंद्र, राज्य सरकार तसेच जिल्हा प्रशासनाच्यावतीने अत्यंत कठोर कारवाई केली जाणार असल्याचे ना. धोत्रे यांनी स्पष्ट केले आहे.
अफवा नको; घरी उपचार टाळा!
जीवघेण्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सोशल मीडियावर विविध प्रकारचे संदेश पसरविल्या जात आहेत.
अशा संकटसमयी सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा टाळण्याचे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा आ. रणधीर सावरकर यांनी केले आहे.
तसेच घरातील सदस्य आजारी पडल्यास त्यावर घरी उपचार न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घेण्याचे आवाहन आ. सावरकर यांनी केले आहे.